भगवान मंडलिक

डोंबिवली : रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे मुंबईत कामासाठी जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह खासगी कंपनीतील नोकरदार वर्गासाठी बेस्ट उपक्रम आणि एसटी महामंडळाने विविध शहरांतून अतिरिक्त बस वाहतूक सुरू केली. मात्र या बसगाडय़ांमध्ये बेस्ट किंवा एसटी कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असून इतर सेवांमधील कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. या भेदभावामुळे सकाळी सहा वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना साडेआठ वाजेपर्यंत रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

राज्य शासनाने सरकारी कार्यालये १५ टक्के तर खासगी कार्यालये १० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे त्यांना बस वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. कल्याण-डोंबिवलीतील कर्मचारी कामावर जाण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडून बस थांब्यांवर रांगा लावतात. या ठिकाणी बेस्ट उपक्रमाच्या आणि राज्य परिवहन सेवेच्या बस आल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यामध्ये प्रवेश दिला जात नाही. सुरुवातीला स्वत:च्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि इतर सेवेतील कर्मचाऱ्यांना दुय्यम प्राधान्य दिले जाते. इतर कर्मचाऱ्यांनी बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तुमच्यासाठी पाठीमागून बस येत असल्याचे वाहकाकडून सांगण्यात येते. तसेच ही बस केवळ बेस्ट, एसटी कर्मचाऱ्यांसाठी असल्याचेही वाहकाकडून सांगण्यात येते. एक ते दीड तास रांगेत उभे राहूनही बस वेळेवर मिळत नसल्याने कल्याण, डोंबिवली ते मुंबई, पालघर, वसई, पनवेलपर्यंत बस वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

खास बससेवा

बस थांब्यांवर बेस्टच्या बस आल्या की मुंबईतील रुग्णालये, मुंबई महापालिका, अग्निशमन सेवेचे कर्मचारी प्राधान्याने बसमध्ये घेतले जातात. एकीकडे बेस्ट मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सेवा देत असल्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्षात सेवा देताना दुजाभाव करत असल्याच्या तक्रारी प्रवासी करतात. बेस्ट, पालिका कर्मचारी जसे कामासाठी जातात तसे आम्ही अत्यावश्यक सेवेसाठीच जातो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हा दुजाभाव टाळण्यासाठी बेस्ट व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

बेस्ट बसगाडय़ांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना बसू देत नसल्यास संबंधित प्रवाशाने बसचा क्रमांक, बस थांबा, वेळ या तपशिलासह ०२२-२४१४६५३३ किंवा ०२२-२४२४६८९८ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. संबंधित कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

-मनोज वराडे, उपजनसंपर्क अधिकारी, बेस्ट