ठाण्यातील भाईंदर येथील साडे तीन हेक्टर मैदान नाममात्र भाड्याने विहंग एंटरप्राइझेस याना देण्याचा प्रस्ताव महासभेत करण्यात आला होता. सत्ताधाऱ्यांनी महासभेत गदारोळ करत तब्बल ४०० प्रस्तावांची २० मिनटात मंजुरी घेतली. याबाबत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते यांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. मात्र याचा काहीच फायदा न झाल्याने राष्ट्रवादीने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केली.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील भाईंदर येथील साडे तीन हेक्टर पालिकेचा भूखंड विहंग इंटरप्राइझेस यांना मिळावा, अशी विनंती महासभेत करण्यात आली होती. त्यानुसार २० जून रोजी झालेल्या महासभेत या प्रस्तावाला विरोध केल्यानंतरही हा मंजरी मिळाली. त्याची दखल कुणीच घेत नसल्याने ठाण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. हा भूखंड देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही या प्रक्रियेबाबत असलेली नियमावली पायदळी तुडवत हा भूखंड विहंग इंटरप्राइझेसला देण्यात आला. यामध्ये सत्ताधारी आणि प्रशासनाची मिलीभगत करुन लोकशाहीचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालय यावर काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.