डोंबिवलीत त्रिदिनात्मक शतचंडी यागाचे आयोजन
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता यावी आणि महापौर आपल्या पक्षाचाच असावा, यासाठी या पक्षाच्या नेत्यांनी आता थेट यज्ञयागाचा मार्ग अवलंबला आहे. शिवसेनेचे आव्हान स्वीकारत स्वबळावर निवडणुकीच्या िरगणात उतरलेल्या भाजपने बहुमतासाठी चक्क त्रिदिनात्मक शतचंडी याग या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकीकडे प्रचारात कल्याण-डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असताना मतदानाचा दिवस जवळ येऊ लागताच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी यज्ञयाग सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बिहार निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लालूप्रसाद यादव यांच्या अंधश्रद्धेवर टीका करीत असताना कल्याण-डोंबिवलीत भाजपने हे काय सुरू केले आहे, असा सवाल शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना उपस्थित केला. आधी चुकीच्या उमेदवारांची निवड करून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला आणि चुकांचे परिमार्जन म्हणून यज्ञयागाचा मार्ग स्वीकारला, अशी बोचरी टीकाही या नेत्याने केली.
भाजपचे पश्चिम परिमंडळाचे अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी येथील शुभमंगल कार्यालयात तीनदिवसीय यागाचे आयोजन केले आहे. मंगळवारी सकाळी या यागाची सुरुवात झाली. २९ ऑक्टोबरला आहुती दिल्यानंतर या यागाची समाप्ती होईल. एकूण २१ ब्रह्मवृंद या यागात वेदपठण करतील.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकवटली आहेत. मुख्यमंत्र्यांनीही कल्याण-डोंबिवलीत प्रचाराचा धडाका लावला असून स्मार्ट सिटीसाठी सुमारे ६५०० कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ जाहीर केले आहे. एकीकडे विकासाच्या अवतीभवती प्रचार कसा राहील याची काळजी भाजपचे वरिष्ठ नेते घेत असताना स्थानिक नेत्यांनी मात्र विजयासाठी थेट यज्ञाचे आयोजन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हा संस्कृतीचा भाग’
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, त्यात चुकीचे काय, असा सवाल पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. यज्ञयागाचे कार्यक्रम आयोजित करणे आपल्या संस्कृतीचा भाग नाही का, असाही प्रश्न या पदाधिकाऱ्याने केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp done worship
First published on: 28-10-2015 at 09:10 IST