दाम्पत्यास अटक

कुटुंबीयांनी तुमच्यावर करणी केली असून त्यामुळे तुमचा मृत्यू होणार आहे, असे सांगून एका दाम्पत्याने मुंब्य्रातील एका महिलेला सुमारे ३० लाखांचा गंडा घातला. ठाणे पोलिसांच्या जादूटोणाविरोधी पथकाने या दाम्पत्याला अटक केली आहे.
रुबीना जावेद शेख (३९) आणि जावेद कासम शेख (५४) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव असून ते मुंब्रा-कौसा भागात एका भाडय़ाच्या खोलीत राहतात. याच भागात हनिफा अहमद पटनी (५४) ही महिला राहते. तिचे मुंबईतील मटण स्ट्रीट परिसरातही घर आहे. शेख दाम्पत्य तिच्या घराशेजारीच राहायचे. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख होती. पाच वर्षांपूर्वी हनिफाच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे ती मुंब्य्रातील घरी एकटीच राहात होती.
गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या विकारामुळे ती आजारी आहे. या संधीचा फायदा घेऊन शेख दाम्पत्याने तिला गंडा घातला. ‘‘घरातील लोकांनी जादूटोणा व करणी केल्याने तुझा आजार बरा होत नाही,’’ असे सांगून शेख दाम्पत्याने तिला एक मंतरलेला दगड, तीन तावीज आणि जपमाळ, अशा वस्तू विकत घेण्यास सांगितले. या वस्तू विकत घेतल्या नाही तर तुला लवकर मरण येईल, अशी भीती दाखवून तिला त्या वस्तू विकत घेण्यास भाग पाडले. त्यानंतर दिल्लीतील हजरत बाबाकडून उपचार करण्याच्या नावाखाली लिंबूचा उतारा करण्यास सांगून सुमारे २५ लाख रुपये आणि १५ तोळे सोन्याचे दागिने घेतले. या विधीनंतरही आजार बरा होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, ठाणे जादूटोणाविरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने तपास करून शेख दाम्पत्यास अटक केली.
विशेष म्हणजे, २५ लाख रुपये देण्यासाठी पीडित महिलेने तिचे मुंब्य्रातील घर विकले आणि बँकेतील दहा लाखांची मुदत ठेवची रक्कमही मोडीत काढली, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.