वसई-विरारमध्ये पोलिसांची कारवाई

वसई-विरार शहारात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली आहे. पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. पूर्वी बांधकाम मजूर म्हणून काम करणारे बांगलादेशी नागरिक आता गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वसई-विरार शहराची लोकसंख्या वाढत असून या वाढत्या शहरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बेकायदा वास्तव्य करणारे बांगालदेशी नागरिकांची समस्या. वसई-विरार शहराच्या अनेक भागात बांगलादेशी नागरिक घुसखोरी करून राहत असून गुन्हेगारी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग आढळून आला आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही मोहीम तीव्र झाली आहे. वालीव, तुळींज, माणिकपूर, नालासोपारा पोलिसांनी ही कारावाई सुरू केली आहे. पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेनेही बांगालादेशींविरोधात कारवाई सुरू केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आणले होते. त्याचा सूत्रधारही बांगलादेशी नागरिक असून देहविक्रीसाठी फसवून आणलेल्या अनेक मुली नालासोपारा शहरात राहत असल्याचे आढळून आले आहे.

बनावट नोटांच्या व्यवहारात बांगलादेशी नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी अनेक बांगलादेशी नागरिकांकडे पारपत्र आणि आधार कार्डदेखील आढळून आले आहे. सीमेवरून घुसखोरी करून भारतात येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची समस्या नवीन नाही, असे वसईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पूर्वी बांगलादेशी नागरिक बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. आता मात्र बनावट नोटा आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा मोठा सहभाग आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांना हवे असलेले अनेक बांगलादेशी आरोपी वसई-विरार भागात राहत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

२० बांगलादेशींना अटक

गेल्या काही दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत २० बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. नालासोपारा आणि वसईतून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यात महिलांचाही समावेश आहे. बांग्लादेशी नागरिकांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केले जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. नागरिाकांनी अशी घुसखोरांबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्षाला कळवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.