पोलिसांच्या बंदीनंतरही रामदास आठवलेंकडून जाहीर सभेत भाषण

रात्री दहा वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक वाजवण्यास बंदी असतानाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी उल्हासनगर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जाहीर सभेत हा नियम पायदळी तुडवून भाषण केले. पोलिसांनी दहा वाजता ध्वनिक्षेपक आणि यंत्र बंद केल्यानंतरही आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी दहा वाजून २० मिनिटांनी ध्वनिक्षेपक सुरू केले. तसेच या सभेदरम्यान ध्वनिप्रदूषणाचे नियमही पायदळी तुडवण्यात आले असले तरी पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जाहीर सभेचे आयोजन उल्हासनगरच्या गोल मैदान येथे सोमवारी सायंकाळी उशिरा करण्यात आले होते. उल्हासनगरची जागा रिपाइंसाठी सोडावी आणि उमेदवार जाहीर करावा या मागणीसाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना भाजपच्या जागावाटपाचा तिढा सुटत नसताना त्यापूर्वीच आठवले उल्हासनगरच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर करतील का, असा सवाल उपस्थित होत होता. सभेची आठ वाजताची वेळ असतानाही रामदास आठवले १० वाजून १७ मिनिटांनी सभास्थळी पोहोचले. त्यापूर्वीच पोलिसांनी ध्वनिक्षेपक बंद केले होते. मात्र आयोजकांच्या मागणीनंतर रामदास आठवले यांनी ध्वनिक्षेपक सुरू करून चार मिनिटांचे भाषण केले. या वेळी त्यांनी उल्हासनगरची जागा रिपाइंला सोडण्यासाठी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

पोलिसांची बघ्याची भूमिका

केंद्रीय राज्यमंत्री असतानाही नियमबाह्य पद्धतीने रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक सुरू करत भाषण केल्याने आठवले यांच्यावर आता पर्यावरणप्रेमींकडून टीका होत आहे. हा ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग आणि न्यायालयाचा अवमान असून पोलिसांच्या फौजफाटय़ासमोरच हा प्रकार सुरू असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सभास्थळी १० वाजून १७ मिनिटांनी पोहोचलेल्या आठवलेंच्या स्वागतासाठी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सभेसाठी वाहतुकीचे आणि बेकायदा बॅनरबाजी करत अनेक नियम पायदळी तुडवल्याचा आरोप  केला जात आहे. हिराली फाउंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी सभेनंतर लगेचच यावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस स्वत:हून गुन्हा दाखल करणार नसतील तर न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही खानचंदानी यांनी सांगितले. या प्रकरणी सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी सांगितले आहे.