गणेश नाईकांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीच्या बैठकीत घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला असतानाही, पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावर जयंत पाटील यांनीही ‘तुम्ही ज्यांचे नाव घेता, त्यांनीही मनाची तयारी करावी’ असे सांगत नाईकांसमोर गुगली टाकला; परंतु शरद पवार यांनी सारवासारव करत नाईकांना या पेचातून बाहेर काढले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाईक यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला असला तरी नाईक यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. ‘दिल्लीला जायची माझी इच्छा नव्हती आणि यापुढेही नसणार’ असे नाईक यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ‘ठाणे आणि कल्याण या दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांची मी लढावे अशी इच्छा आहे. मात्र, या दोन्ही मतदारसंघांत पक्षातर्फे जो उमेदवार दिला जाईल त्यामागे मी उभा राहीन,’ असे ते म्हणाले.

डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी सभागृहात गणेश नाईक यांच्यासोबत ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड, पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे तसेच माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईदर परिसरांतील प्रमुख पदाधिकारी तसेच नेते उपस्थित होते. राज्य तसेच देशातील विविध मुद्दय़ांवर विस्तृत भाषण केल्यानंतर पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत थेट संवाद सुरू केला. या वेळी काहींना प्रश्न विचारण्याची संधीही देण्यात आली. ठाणे लोकसभा मतदारसंघातून पक्ष यंदा कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात असताना काही पदाधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. त्याच वेळी अन्य उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही नाईक यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. हे सर्व सुरू असतानाच शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरील स्मित सभागृहातील मोठय़ा व्हिडीओ पडद्यावर स्पष्ट दिसत होते. सभागृहातील एकंदर नूर पाहाता जयंत पाटील यांनी माइक हातात घेत ‘ज्यांचे नाव घेतले जात आहे त्यांनी मनाची तयारी करावी आणि सभागृहाने तसा ठराव करावा’ असा गुगली टाकल्याने नाईकही काही काळ गांगरले. मात्र, लगेच पवारांनी सावध पवित्रा घेत ‘उमेदवार लवकरच ठरविला जाईल आणि जो कोणी असेल त्यामागे उभे राहून कष्टाची तयारी ठेवा’ असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे नाईक यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पवारांची तीक्ष्ण नजर

ठाण्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे हे या बैठकीला गैरहजर होते. जगदाळे आणि पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील बेबनाव याला कारणीभूत असल्याची चर्चा होती. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणाऱ्या पवारांनी जगदाळे यांची अनुपस्थिती टिपताच सारेच चकित झाले. माइक हातात घेताच पवारांनी ‘नजिब, हणमंत (जगदाळे) कुठे आहेत?’ असा प्रश्न नजीब मुल्ला यांना केला. या प्रश्नाने नजीब मुल्लाही गांगरून गेले. मात्र, ‘साहेब, ते व्यक्तिगत कार्यक्रमासाठी बाहेर गेले आहेत’ असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. त्यावर ‘कुणी गैरहजर असले तरी माझ्या नजरेतून ते सुटणार नाही’ असे सूचक वक्तव्य पवारांनी केले.