रात्री उशिरा आलेल्या आदेशांबाबत व्यापारी अनभिज्ञ; कारवाईमुळे नाराजी

बदलापूर : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सायंकाळी उशिरा काढलेल्या जिल्हा टाळेबंदीच्या आदेशाच्या अंमलबजावणीत गुरुवारी बदलापूर आणि अंबरनाथ शहरात गोंधळ पहायला मिळाला. रात्री उशिरा काढण्यात आलेल्या आदेशांची कल्पना नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडली. अनेक नागरिकांनाही याची कल्पना नसल्यामुळे ते घराबाहेर पडले. यापैकी काहींना पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावे लागले.

करोनासंकटात झालेल्या टाळेबंदीत सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबई महानगर प्रदेशात मोडणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील दुकाने सर्वप्रथम सुरू झाली होती. दुकाने सुरू होण्यास एक महिना उलटत नाही तोच अंबरनाथमध्ये सर्वप्रथम स्थानिक पातळीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायती आणि ग्रामीण क्षेत्रात टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा, दुकाने यांच्यासह यापूर्वीच्या टाळेबंदीत बंद असलेली अनेक आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. अंबरनाथ शहरात यापूर्वीच लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने लागू केलेल्या या टाळेबंदीच्या आदेशाचे व्यवस्थित वाचन न झाल्याने अंबरनाथ शहरात काही व्यापारी संघटना सरसकट दुकाने बंद करण्यासाठी आग्रह धरताना दिसत होत्या. तर बदलापूर शहरात सकाळीच सम विषम पद्धतीने अनेक दुकाने सुरू झाली होती. अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आदेशाची माहिती नसल्याचीच बाब सांगितली. रात्री उशिरापर्यंत टाळेबंदीची माहिती मिळाली नाही, स्थानिक नगरपालिकेकडूनही काही माहिती न मिळाल्याने दुकाने उघडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गुरुवारी सकाळी पोलिसांनी अनेक दुकाने बंद केल्याने घराबाहेर पडणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला. दुकानदार, व्यापारी आणि ग्राहकांमध्येही गोंधळाचे वातावरण असतानाच रस्त्यावर पोलिसांनी वाहनांवर कारवाई केल्याने नागरिक संताप व्यक्त करत होते.

सरसकट बंदी कशाला?

गेल्या काही दिवसांमध्ये भाजीपाला विक्रेते, मटण, मासळी आणि मद्यविक्रीची दुकाने या ठिकाणी सर्वाधिक गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर दुकानांमध्ये तुलनेने खूपच कमी ग्राहक येतात. गर्दी नसलेल्या दुकानांमध्येही सरसकट बंदी करणे चुकीचे असल्याचे मत बदलापूर बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्र मंडळाच्या राजेश जाधव यांनी व्यक्त केले.