News Flash

ठाण्यातील बाजारांत नाताळचा उत्साह

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चरई, वर्तकनगर, वसंतविहारसारख्या ख्रिस्तीबहुल परिसरांमध्ये इमारती आणि घरांवर रोषणाई करण्यात आली आहे.

येशू जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी चर्चचे आवार सजले असून चर्चेवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

शहरातील सर्व चर्चवर आकर्षक रोषणाई

नाताळ जवळ आल्यामुळे सांताक्लॉजच्या टोप्या, ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य, केक आणि अन्य मिठाई खरेदी करण्यासाठी सध्या ठाण्यातील बाजार आणि मॉलमध्ये गर्दी होत आहे. ख्रिस्ती बांधवांसह अन्य धर्मीयही हा सण उत्साहाने साजरा करत असल्यामुळे त्यासाठीचे साहित्य विकत घेण्यासाठी जांभळी नाका, गावदेवीतील बाजारांतील वर्दळ वाढली आहे. शहरातील सर्व चर्च आकर्षक रोषणाईने झगमगत आहेत. येशू जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी त्यांचे आवार सजले आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चरई, वर्तकनगर, वसंतविहारसारख्या ख्रिस्तीबहुल परिसरांमध्ये इमारती आणि घरांवर रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिसमस ट्री उभारून सजवण्यात आले आहेत. विवियाना, कोरम, आर मॉलसह अन्यही लहान-मोठय़ा मॉलमध्ये देखावे उभारण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणींना देण्यासाठी विविध भेटवस्तूंचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. नौपाडा, राम मारुती मार्गावरील दुकानांच्या दर्शनी भागांत, लाल, पांढऱ्या रंगांचे पोशाख, हुडी असलेले उबदार कपडे, पार्टी वेअर लावण्यात आले आहेत. प्लमकेक, रमबॉलकेक आणि मेचपेन यासारखे विविध केक आणि मिठाया बाजारात उपलब्ध आहेत. ठाण्यातील सर्वात जुने चर्च अशी ओळख असणाऱ्या सेंट जेम्स आणि सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चकडून यंदाही सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहे. जांभळी नाका येथील सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे २४ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता मिस्सा या सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच ते सहा हजार नागरिक या प्रार्थनेत सहभागी होणार आहेत, असे चर्चचे फादर सुनील यांनी सांगितले. गाईचे महत्त्व सांगणारी प्रतिकृती चर्चच्या आवारात उभारण्यात येणार असून याद्वारे ख्रिस्ती धर्मातील सात संस्कारांची माहिती दिली जाणार आहे.

सामाजिक उपक्रम

ठाणे कारागृह परिसरातील सेंट जेम्स चर्चतर्फे दरवर्षीप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिका यांना फळे तसेच भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबईतील अनाथ मुलांनादेखील भेटवस्तूंचे वाटप करण्यात येईल, असे सेंट जेम्स चर्चचे उज्ज्वल वारघट यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 2:10 am

Web Title: christmas enthusiasm in thane markets
Next Stories
1 फुगे, चिरोटे, उंबरे आणि शिंगोळय़ा!
2 कचरा वर्गीकरण न केल्यास दंड
3 मच्छीमार ‘वांब’मार्गाला!
Just Now!
X