साठा येण्याची कुणकुण लागताच गर्दी; एक लाख कुप्या उपलब्ध

ठाणे : अपुऱ्या साठय़ामुळे वारंवार खंडित होत असलेली लसीकरण मोहीम सोमवारी पुन्हा जोमात सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्याला रविवारी १ लाख ४ हजार ९० लशींचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे सोमवारी सुरू होती. दुसरीकडे, येत्या एक तारखेपासून सर्वाच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर लशींचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन ४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे जिल्ह्य़ात लशीच्या तुटवडय़ामुळे गेले दोन ते तीन दिवस अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती. लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना माघारी परतावे लागले होते. दरम्यान, रविवारी १ लाख ४ हजार ९० लशींचा साठा जिल्ह्य़ाला उपलब्ध झाला. यामध्ये १ लाख कोव्हिशिल्ड तर, ४ हजार ९० कोव्हॅक्सिन लशींचा सामावेश आहे. साठा उपलब्ध झाल्याने सोमवारी सकाळपासून बहुतांश लसीकरण केंद्रे सुरळीत सुरू होती. तसेच लस घेण्यासाठी नागरिकांच्याही रांगा लागल्या होत्या. सध्या जिल्ह्य़ात ४५ वर्षांपुढील नागरिक तसेच आरोग्यसेवक, सफाई कामगार, पोलीस यांचे लसीकरण सुरू आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वाना लस देण्याचे आदेश केंद्र आणि राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होईल या भीतीने ४५ वर्षांपुढील नागरिक तसेच आरोग्यसेवक, सफाई कामगार, पोलीस यांची लस घेण्यासाठी आता लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ५६ लसीकरण केंद्रे असून त्यापैकी सोमवारी ३५ केंद्रे सुरू )होती. त्यामध्ये सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती तर, इतर केंद्रांवर कोविशिल्ड लस देण्यात येत होती.

ठाणे शहरातील चितळसर मानपाडा भागातील लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठय़ा संख्येने गर्दी झालेली पाहायला मिळाली. तर, जिल्हा शासकीय रुग्णालयातही नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. कल्याण – डोंबिवली शहरात १६ लसीकरण केंद्रे असून सोमवारी या सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

नागरिक रांगा लावून या केंद्रांवर  लस घेत होते. तर, अंबरनाथ शहरात एक, बदलापूर शहरात चार आणि उल्हासनगर शहरात नऊ लसीकरण केंद्र असून या केंद्रांवरही सुरळीत लसीकरण सुरू होते.

शहरनिहाय लसीकरण

शहर                पहिला डोस     दुसरा डोस      एकूण

ठाणे ग्रमीण     १,३९,७२१      २२,८३०        १,६२,५५१

ठाणे               २,१६,६८४       ५१,९६७        ,६८,६५१

मीरा-भाईंदर    १,३६,४९०       २६,८५२        १,६३,३४२

नवी मुंबई      १,९६,७२८         ४४,७०२          २,४१,४३०

उल्हासनगर     २७,८८६         ३,६४५             ३१,५३१

भिवंडी            २६,२२५         ४२५८               ३०४८३

कल्याण-डोंबिवली १,२६,३११       १९,७३३       १,४६,०४४

एकूण         ८,७०,०४५       १,७३,९८७           १०,४४,०३२

 

लसीकरण केंद्रांवर रांगा

लशींचे वाटप

शहर                कोव्हिशिल्ड      कोव्हॅक्सिन

ठाणे                    २४०००         १०००

कल्याण-डोंबिवली १२०००        १०००

नवी मुंबई             २७०००        १०००

मीरा-भाईंदर     १६०००           १०००

भिवंडी                २०००          ०

उल्हासनगर     ४०००              ०

ठाणे ग्रामीण     १५०००            ९०

एकूण              १,००,०००        ४,०९०