सामाजिक अंतर न राखता गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

वसई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करून सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र वसई—विरार शहरात विविध ठिकाणी सामाजिक अंतर न राखताच सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन होऊ लागले आहे.

वसई—विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मात्र तरीही नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी आणि सिलिंडर घेण्यासाठी नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. टाळेबंदीच्या आधी नागरिकांना गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या घरांपर्यंत गॅस सिलिंडर पोहचविला जात होता. परंतु

देशात टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर सिलिंडर हा ग्राहकांच्या घरापर्यंत पोचत नसल्याने वसई—विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात गॅस सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावून उभे राहावे लागत आहे, तर सिलिंडरचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याने गॅस वितरण करणारी गाडी आल्यानंतर नागरिकांची झुंबड उडते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतरही राखले जात नाही, तर काही नागरिक मास्कही तोंडाला लावत नसल्याने विषाणूचा प्रादुर्भाव  वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांनी घरोघरी येऊन गॅस वितरण केले जावे, अशी मागणी होत आहे.

नागरिकांची कसरत

घरोघरी गॅस सिलिंडरचे वितरण होत नसल्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. टाळेबंदीमुळे वाहनांवर तसेच रिक्षांवर बंदी असल्यामुळे सिलिंडर घरापर्यंत खांद्यवरून घेऊन जावे लागत आहे. चार मजल्यांच्या इमारतीमध्ये लिफ्ट नसल्यामुळे सिलेंडर चौथ्या मजल्यावर नेण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

गॅस सिलिंडर घरोघरी येत नसल्याने ग्राहकांची मोठी गर्दी रस्त्यावर होऊ लागली आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. यासाठी ग्राहकांना घरोघरी गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी गॅस वितरण कंपनीला करण्यात आली आहे.

महेश सरवणकर, भाजपा उपाध्यक्ष वसई रोड