* नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळेकर यांचा संकल्प * रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याची ग्वाही
कल्याण-डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळ दररोज स्वच्छ असला पाहिजे. शहराचे आरोग्य आणि कीर्ती ही सार्वजनिक स्वच्छतेवरून ठरत असते. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरे नियमित स्वच्छ राहतील असा प्रयत्न असेल. सार्वजनिक स्वच्छतेबाबत घनकचरा विभागातील वाहने, वाहन चालक, साधने, कामगार हे जे काही अडथळे आहेत; ते प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ ला सांगितले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे बारावे महापौर म्हणून राजेंद्र देवळेकर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. यावेळी देवळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील स्वच्छता हा शहराचा आरसा असतो. स्वच्छतेवरून शहराची चांगलीवाईट चर्चा बाहेर होत असते. उद्योग, बांधकाम, व्यापारविषयक गुंतवणूक करताना संबंधित व्यावसायिक शहर स्वच्छतेला प्राधान्य देतात. हा व्यापक दृष्टिकोन ठेवून कल्याण, डोंबिवली शहरातील २७ गावांसह जे शहरी भाग आहेत. त्यामधील रस्ते, गल्लीबोळात नियमित झाडलोट होईल यावर आपला कटाक्ष असेल, असे देवळेकर म्हणाले.

महापौरांची आश्वासने
’घनकचरा विभागाने यापूर्वी शहर स्वच्छतेची खासगीकरणातून कंत्राटे दिली. नंतर ती रद्द केली. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे उद्भवली. घनकचरा विभागातील कचरावाहू वाहनांचे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर आपला भर राहणार आहे.
’मागील चार वर्षांपासून कल्याण, डोंबिवलीत सिमेंट, डांबरीकरणाच्या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. एकही रस्ता मनाजोगा पूर्ण झालेला नाही. रस्ते पूर्ण झाले की त्या रस्त्यात कोणती तरी यंत्रणा येऊन खोदकाम करते. हे सगळे गैरप्रकार यापुढील काळात रोखले जातील.
’या रस्ते कामांसाठी एक सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत.
’वाहतूक कोंडीने कल्याण, डोंबिवली शहरवासीय हैराण आहे. वाहने वाढली आहेत. कल्याणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि रखडलेला गोविंदवाडी बाह्य़ वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
’डोंबिवली पश्चिमेत खाडीवर उभारण्यात येणाऱ्या माणकोली उड्डाणपुलाचे काम विनाविलंब सुरू व्हावे, यासाठी ‘एमएमआरडीए’कडे पाठपुरावा करण्यात येईल.
’कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात रेल्वे मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. डोंबिवलीत स. वा. जोशी शाळा, मोहने येथील रखडलेला उड्डाण पूल ही कामे लवकर सुरू व्हावीत यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात येईल.

फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविणार
सर्वसमावेशक आरक्षणाखाली पालिकेच्या अनेक जागा खासगी जमीन मालकांच्या ताब्यात आहेत. या जागा पालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. रेल्वे स्थानक परिसरांना फेरीवाल्यांनी गिळून टाकल्यासारखी परिस्थिती आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचा विचार करून फेरीवाल्यांना कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाला क्षेत्रात बसवण्याच्या दृष्टीने काटेकोर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.