‘लाइट रेल’ यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव

ठाणे :  ठाणे शहरातील अंतर्गत भागातील प्रवासी वाहतूक सुलभ व्हावी यासाठी महापालिकेने आखलेल्या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या विरोधामुळे खीळ बसली असून अंतर्गत वाहतुकीसाठी मेट्रोऐवजी लाइट रेल यंत्रणा उभारण्याचा नवा प्रस्ताव आता महापालिकेने आखला आहे. यासंबंधीचा प्रकल्प अहवाल तयार असल्याचा दावा प्रशासनाने केला असून यंदाच्या वर्षांत या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठाणे शहराच्या घोडबंदर मार्गावर मेट्रोचे जाळे विस्तारत असताना अंतर्गत भागातील प्रवासासाठी आयुक्त संजीय जयस्वाल यांनी मेट्रो प्रकल्पाचा आग्रह धरला होता. ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात अंतर्गत मार्गावर प्रवासी वाहतुकीचा पर्याय मार्ग सुरू करता यावा यासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यानुसार यापूर्वी रिंग रेल्वे, ट्राम, मोनो अशा वेगवेगळ्या वाहतूक पर्यायांचा विचारही करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र यापैकी एकही वाहतूक पर्याय आतापर्यंत प्रत्यक्षात आणता आलेला नाही. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई-ठाणे आणि पुढे भिवंडी, कल्याण, बदलापूर मार्गावर मेट्रोची आखणी करण्यात आली असून त्यापैकी मुंबई-ठाणे मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने अंतर्गत मार्गावर मेट्रो प्रकल्प सुरू करता यावा यासाठी प्रकल्प अहवालही तयार केला होता. त्यानुसार अंतर्गत मेट्रो मार्गिकेवर २९ किलोमीटर अंतराचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी नऊ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा खर्च येणार असल्याने हा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने त्यास मान्यता देत केंद्र सरकारकडे आर्थिक साहाय्यासाठी या प्रकल्पाची शिफारस केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यवहार्यता तपासणी केल्यानंतर अंतर्गत वाहतूक प्रकल्पासाठी मेट्रो प्रणालीचा वापर करण्याचा राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

वर्तुळाकार रेल्वे मार्ग

अंतर्गत प्रवासासाठी असलेल मेट्रोचा पर्याय खर्चीक असून तिथे लाइट रेल प्रकल्पाचा विचार व्हावा अशा सूचना केंद्र सरकारने यासंबंधी दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे महापालिकेने मेट्रोसाठी आधी आखलेल्या २९ किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकार मार्गावर लाइट रेल ट्रान्सिटचा नवा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी लवकरच महाराष्ट्र सरकारकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी बुधवारी अर्थसंकल्प मांडताना दिली. या प्रकल्पासाठी नेमका किती खर्च येईल यासंबंधी अजूनही स्पष्टता आली नसली तरी पूर्वीच्या मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत या प्रकल्पाचा खर्च दोन हजार कोटींपेक्षा कमी असेल असा दावा केला जात आहे. यासंबंधीचा प्रकल्प अहवाल लवकरच राज्य सरकारकडे पाठविला जाणार असून ठाणे महापालिकेचा हिस्सा म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे, असे अहिवर यांनी स्पष्ट केले.