मीरा-भाईंदर शहरासाठी मुख्यमंत्र्यांकडून विविध योजनांची घोषणा

मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने राज्य सरकारने या शहराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विविध योजनांचा पाऊस मीरा-भाईंदरवर पाडला. भाईंदर आणि वसई यांना जोडणारा खाडीपूल, भाईंदर पश्चिम ते दहिसर रेल्वे समांतर रस्ता, जेसल पार्क ते घोडबंदर खाडीकिनारा रस्ता, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन रस्ता, मीरा-भाईंदरला येणारी मेट्रो कासारवडवलीपर्यंत अशा अनेक योजनांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा रोड येथे केली. यातील बहुतांश कामे येत्या डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

मीरा-भाईंदरला २४ तास पाणी देणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोमवारी मीरा रोड येथे करण्यात आले. १,३२० कोटी रुपयांची ही योजना एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. मीरा-भाईंदरची ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना ज्याप्रमाणे मुदतीआधी पूर्ण करण्यात आली, त्याचप्रमाणे सूर्या पाणीयोजना वेळेआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मीरा-भाईंदरला शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून हे शहर स्मार्ट बनवण्यासाठी येथील योजनांना तात्काळ मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमाला भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित असल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

कोणत्या योजना?

* भाईंदर आणि वसई या शहरांना जोडणारा ८७५ कोटी रुपयांचा खाडीपूल.

’ रस्ता वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी भाईंदर पश्चिम ते दहिसर हा १६० कोटी रुपयांचा रेल्वे समांतर रस्ता.

*  जेसल पार्क ते घोडबंदर या खाडीकिनाऱ्यावरून जाणारा ८० कोटी रुपयांचा पर्यायी रस्ता.

*  भाईंदर पश्चिम ते उत्तन हा १४४ कोटी रुपयांचा रस्ता.

* मीरा-भाईंदपर्यंत येणारी मेट्रो ठाण्यातील कासारवडवलीपर्यंत नेण्यात येणार आहे.

* मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय आणि पोलीस आयुक्तालय.

* धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी नवी नियमावली.

* इमारतींच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेअन्स) नियमांतील अडचणी दूर करणारी कायदेशीर तरतूद.

* घोडबंदर किल्ला, बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन स्मारकांसाठी सरकारकडून  विशेष निधी.

काँग्रेसकडून काळे झेंडे

भाजपकडून करण्यात येणाऱ्या घोषणा फसव्या असून नागरिकांच्या दिशाभूल करणाऱ्या आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी सावंत यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.