वागळेपाठोपाठ कोपरीत कारवाई; नौपाडय़ातील काही इमारतींचा परिसर बंद

ठाणे : कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आणि सावरकरनगर, लोकमान्यनगरपाठोपाठ काही दिवसांपूर्वी ‘ग्रीन झोन’ असलेला कोपरी परिसरही संपूर्णपणे टाळेबंदीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या ३ मेपर्यंत परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणार आहेत. या काळात केवळ औषधालये खुली राहणार आहेत. या भागात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून वाढ होऊ लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडय़ातही रुग्णांची संख्या वाढू लागली असून ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत. तेथील इमारतींचा परिसर बंद करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून महापालिका क्षेत्रात मंगळवारी दिवसभरात १५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महापालिका क्षेत्रातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा २५६ इतका झाला आहे. सुरुवातीला कळवा-मुंब्रा परिसरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. त्यामुळे येथील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर टाळेबंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वागळे इस्टेट आणि सावरकर-लोकमान्यनगर परिसरातही करोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने हा परिसरही पूर्णपणे टाळेबंद केला. हे परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, ठाणे शहराच्या पूर्व बाजूस असलेल्या कोपरी परिसरात मात्र करोनाबाधित रुग्ण आढळले नव्हते. त्यामुळे हा परिसर प्रशासनाने ग्रीन झोन म्हणून घोषित केला होता. तसेच या भागात बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून परिसराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. या खबरदारीनंतरही या ठिकाणी गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून मंगळवारी कोपरीतील दाटीवाटीचा परिसर असलेल्या आनंदनगर भागातही रुग्ण आढळले आहेत. या भागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १० इतकी झाली असून या भागातही दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर टाळेबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू करण्यात आली असून ३ मेपर्यंत ही टाळेबंदी लागू राहणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

नौपाडा येथील प्रशांतनगर भागातील एका इमारतीमधील रहिवाशाला करोनाची लागण झाल्याची बाब मंगळवारी उघडकीस आली असून यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही इमारत बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मासळी-मटण बंद

अन्नधान्य दुकाने, बेकरी, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला आणि फळ दुकाने, तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या भाजीपाला आणि फळ मंडई, मासळी, मटण आणि चिकन विक्री दुकाने या आस्थापना ३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दूध, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बेकरी, मासळी, चिकन, मटण आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवाही बंद राहणार आहे. तसेच औषधांची दुकाने सुरू राहणार असून त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाईची गरज

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही नागरिक अकारण रस्त्यावर फिरत आहेत. यामुळेच करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. तसेच करोनाबाधित रुग्ण आढळलेले परिसर मार्गावरोधक (बॅरिकेड्स) लावून बंद केले जात आहेत. या भागातही नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे परिसर पूर्णपणे बंद केले जात आहेत. त्याचप्रमाणे कोपरी परिसरही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.