भगवान मंडलिक
डोंबिवली पश्चिमेकडील गरिबाचा वाडा परिसरातील विकास आराखडय़ात बगीचासाठी आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत उभारण्यास सुरुवात झाली आहे. अनधिकृतपणे इमारत उभी करत असतानाही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीका होत असतानाच या इमारतीच्या पायासाठी करण्यात आलेले खोदकाम भूखंडालगतच्या चाळींसाठी धोकादायक ठरू लागले आहेत.
गरिबाचावाडा भागातील अनमोल नगरीच्या जवळ कांचनगंगा इमारतीच्या समोर (शिवमंदिर) कल्याण डोंबिवली पालिकेचे विकास आराखडय़ातील ‘बगीचा’साठी आरक्षण आहे. मागील अनेक वर्षे रिकाम्या असलेल्या या जागेवर गेल्या महिन्यापासून भूमाफियांनी हा भूखंड बळकावून त्यावर इमारत बांधण्याचे काम सुरू केले आहे. दोन्ही बाजूच्या चाळी आणि लगत असलेल्या एका धर्मस्थळाला खेटून इमारतीचा पाया बांधण्यासाठी १० फुटांचा खोल चौकोनी खड्डा खोदण्यात आला आहे. पोकलनेच्या साहाय्याने हे काम सुरू असल्याने आजूबाजूच्या जुन्या चाळींना धक्के बसले आहेत. या खड्डय़ामुळे चाळींचा पाया भुसभुशीत होऊन चाळी कोसळण्याची भीती परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता मुख्य रस्त्यावर हे बेकायदा बांधकाम बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवून भर पावसात सध्या सुरू आहे.
पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी आरक्षणावरील बेकायदा बांधकामांची दखल घेत नसल्याने काही जागरूक नागरिकांनी या बेकायदा बांधकामाची मुख्यमंत्री, पंतप्रधान पोर्टल, नगरविकास प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.
मुख्य रस्त्यावरील भूखंड माफियांकडून हडप केला जात असताना ‘ह’ प्रभाग कार्यालयातील प्रभाग अधिकारी, अभियंता यांना हे बेकायदा बांधकाम दिसत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘एमआयडीसी’चे डम्पर
बगीचा’ आरक्षणावरील बेकायदा इमारतीच्या उभारणीसाठी लागणारा भराव आणणे, खड्डय़ातून बाहेर काढलेली माती उचलण्यासाठी ‘एमआयडीसी’च्या सेवेत असलेले (ऑन डय़ुटी एमआयडीसी) पिवळे डम्पर या ठिकाणी सतत येजा करतात. या डम्परच्या दर्शनी भागात ‘एमआयडीसी’च्या सेवेत असल्याचे लिहिण्यात आले आहे. हे सगळे डम्पर पोलिसांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून गरिबाचापाडा भागातून ठाकुर्ली उड्डाण पुलावरून येजा करतात. ‘एमआयडीसी’चा दर्शनी भागात उल्लेख असल्याने पोलीस, महसूल, पालिका अधिकारी या डम्परमधील सामानाची चौकशी करीत नसल्याचे कळते. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना या डम्परसंदर्भात विचारणा केली असता, एमआयडीसीने अशा प्रकारे डम्पर ठेकेदारी पद्धतीने किंवा भाडय़ाने घेतलेले नाहीत, असे स्पष्ट केले.
गरिबाचापाडा भागात बगीचा आरक्षणाखाली बेकायदा इमारतीचे काम सुरू आहे. याची अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. तेथे कोणी खड्डा खणला आहे याचीची माहिती नाही. अशा प्रकारे कोणी नियमबाह्य़ काम करीत असेल तर तातडीने ते बांधकाम थांबवून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– ज्ञानेश्वर कंखरे, ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी