तीन बाजारपेठांमध्ये करोना उपचार केंद्राचे पालिकेचे नियोजन

विरार : वसई, विरारमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका रुग्णालयांतील करोना रुग्णांसाठीच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील बाजारपेठा (मार्केट) मध्ये करोना उपचार केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन बाजारपेठांची निवड केली असून लवकरच ही रुग्णालये तयार केली जाणार आहेत. तर म्हाडा येथेसुद्धा पालिका उपचार केंद्र उभारणार आहे.

वसई-विरारमध्ये मागील महिन्यापासून करोना वैश्विाक महामारीची दुसरी लाट उसळली आहे. मागील आठवडाभरात शहरात २७८५ रुग्ण सापडले तर १२ जणांचा जीव गेला आहे. तर बुधवारी ६७१ रुग्ण सापडले आहेत. यामुळे शहरातील रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत असताना खाटा अपुऱ्या पडत आहेत. सध्या पालिकेच्या चंदनसार येथील रुग्णालयात एकही खाट शिल्लक नुसून वसई वरुण इंडस्ट्रीजमध्येसुद्धा क्षमता संपत चालली आहे. यामुळे पालिका आता नवे रुग्णालय उभारत आहे.

वसई विरार महानगरपालिकेने नुकतीच बांधलेली मार्केट विनावापर पडून आहेत. फेरीवाले या मार्केटमध्ये बसण्यास तयार नसल्याने कोट्यवधींचा खर्च वाया जात आहे. यामुळे पालिकेने ही मार्केट आता रुग्णालयात रूपांतरित करून नागरिकांना सुविधा         देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडून तीन बाजारपेठांची पाहणी केली असून सध्या नालासोपारा येथील समेळपाडा परिसरातील मच्छी मार्केट रुग्णालयात रूपांतरण करण्यात येत आहे. याठिकाणी २० ते २५ अतिदक्षता विभाग आणि २५० खाटा तयार केल्या जातील. यासाठी पालिकेने कामसुद्धा सुरू केले आहे.

महापालिकेने खासगी रुग्णालयात पाच खाटा राखीव ठेवण्यासाठी सांगितले आहे. पण खाजगी रुग्णालयात सामान्य रुग्णांना खाटा शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे.  यामुळे शहरात खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध असूनही रुग्णांना खाटा मिळत नाहीत.

शहरातील रुग्णालये

नालासोपारा : विनायका हॉस्पिटल, गॅलेक्सी हॉस्पिटल, रिद्धिविनायक हॉस्पिटल, बदर हॉस्पिटल, विजयलक्ष्मी हॉस्पिटल

वसई : प्लाटिनियम हॉस्पिटल, क्रिष्णा हॉस्पिटल, जनसेवा हॉस्पिटल, कार्डिनल हॉस्पिटल, गोल्डन पार्क हॉस्पिटल

विरार : विजय वल्लभ हॉस्पिटल

महापालिका रुग्णालय : चंदनसार हॉस्पिटल, म्हाडा हॉस्पिटल, वरुण इंडस्ट्रीज

‘डॅशबोर्ड’च नाही

वसई विरार परिसरात रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी असताना पालिकेने करार केलेल्या खासगी आणि पालिका रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र अद्याप पालिकेने डॅशबोर्ड तयार केला नाही. यामुळे खाटा मिळवताना रुग्णांना वणवण करावी लागत आहे.

महापालिका कोविड संदर्भात सुसज्ज सेवा नागरिकांना उपलब्ध करून देत आहे, आरोग्यसेवकांची वाढही करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांना अतिरिक्त देयके आकारली जाणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. शहरातील रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल. -किशोर गवास, उपायुक्त, वसई विरार महानगरपालिका