डोंबिवलीतील प्रकार; रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळपणा
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील घरीच विलगीकरणात असलेल्या एका तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल शनिवारी संध्याकाळी सकारात्मक आला. या तरुणीला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात नेण्यासाठी पालिका प्रशासनाला कळविण्यात आले. परंतु, दीड तास होऊनही पालिकेची रुग्णवाहिका मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
पालिकेच्या पाच ते सहा रुग्णवाहिका आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांचा तुटवडा पडू नये म्हणून पालिका हद्दीतील अनेक खासगी रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी पालिका सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिकांचा वाहतूक व इंधन खर्च शासन खर्चातून पालिकेने करायचा आहे. या रुग्णवाहिका चालकांना पालिकेकडून तात्काळ इतर शहरात जाण्याचा वाहन प्रवेश पास, इंधनासाठी तात्काळ पैसे देण्यात येत नसल्याच्या तक्रारी खासगी रुग्णवाहिका चालकांकडून करण्यात येतात.
करोनाबाधित त्या तरुणीला नेण्यासाठी रुग्णवाहिका येत नाही म्हणून महाराष्ट्रनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे यांनी रुग्णवाहिका चालकाला भाडय़ाचे पैसे देऊन तात्काळ या तरुणीला मुंबईत नेण्याची व्यवस्था केली. पण असे रुग्ण हे पालिका रुग्णवाहिकेतूनच नेण्यात आले पाहिजेत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेची रुग्णवाहिका संध्याकाळी साडे सात वाजता मागविण्यात आली होती. रात्री नऊ वाजले तरी ती आली नाही. या प्रकरणी म्हात्रे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर यांच्याशी सतत संपर्क केला. त्यांना फक्त रुग्णवाहिका येत आहे, अशी उत्तरे दीड तास देण्यात येत होती. ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने या संदर्भात पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, करोना नियंत्रण समन्वयक विनय कुळकर्णी यांच्या हा विषय निदर्शनास आणला. या दोन्ही अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णाला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहे, असे सांगितले. दीड तासाच्या कालावधीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवांगरे हे आम्ही रुग्णवाहिका देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत होते. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यात दोन वॉर्ड बॉय, डॉक्टर नसल्याने एकटय़ा रुग्णाला कस्तुरबाला कसे न्यायचे असा प्रश्न रुग्णवाहिका चालकासमोर निर्माण झाला होता. आमच्याकडे वॉर्डबॉय नाहीत ते कोठून देणार असे प्रश्न शास्त्रीनगरमधील हतबल झालेले डॉक्टर करीत होते. अखेर रात्री साडे नऊच्या दरम्यान करोनाबाधित तरुणीला रुग्णवाहिकेतून शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ती रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिकेतच बसून होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
करोनाबाधित रुग्णांसाठी पालिकेने तत्पर व्यवस्था केल्या असल्या तरी रुग्ण आढळून आला की तात्काळ रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. काही वैद्यकीय अधिकारी अतिशय संथपणे काम करीत आहेत, अशी तक्रार नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. वैद्यकीय विभागातील निष्क्रियपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलून त्यांच्या जागी अनुभवी ज्येष्ठ पालिका डॉक्टरांना संधी देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.