केवळ ४३ टक्केच लसीकरण; पालघरमध्ये ७५ टक्के, तर रायगडमध्ये ४४ टक्के लसीकरण

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : ठाणे, पालघर आणि रायगड या तिन्ही जिल्ह्य़ांतील शासकीय केंद्रावर सोमवारी दिवसभरात ३,७३८ जणांनी लस घेतली असून त्यामध्ये ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी, ६० वर्षांपुढील व्यक्ती, आरोग्यसेवकांचा समावेश आहे. सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के लसीकरण पालघर जिल्ह्य़ात झाले आहे. त्याखालोखाल रायगड जिल्ह्य़ात ४४ टक्के तर ठाणे जिल्ह्य़ात केवळ ४३ टक्केच लसीकरण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पालघर आणि रायगड जिल्ह्य़ाच्या तुलनेत ठाणे जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार ठाणे, पालघर आणि रायगड या तिन्ही जिल्ह्य़ातील शासकीय केंद्रांवर १ मार्चपासून लसीकरण सुरू झाले आहे. याठिकाणी आरोग्यसेवकांना लशीचा पहिला तर काहींना लशीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. त्याचबरोबर ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी आणि ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाही लस दिली जात आहे. अशाप्रकारे तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी दिवसभरात ३,७३८ जणांना लस देण्यात आली. या तिन्ही जिल्ह्य़ात ७,५०० जणांना लस देण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मात्र ३,७३८ जणांनी लस घेतली असून त्याचे प्रमाण ४९ टक्के आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ४९०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी २,१२२ जणांनी लस घेतली आहे. पालघर जिल्ह्य़ात १,५०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी १,१२८ जणांनी लस घेतली. तर, रायगड जिल्ह्य़ात १,१०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी ४८८ जणांनी लस घेतली आहे. पालघर जिल्ह्य़ात ७५ टक्के तर ठाणे जिल्ह्य़ात ४३ टक्के लसीकरण झाले.

जिल्ह्यत ३९ केंद्रे

जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये ३९ शासकीय लसीकरण केंद्रे आहेत. या केंद्रांवर सोमवारी दिवसभरात २,१६० जणांनी लस घेतली. त्यामध्ये ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी असलेले १३१ तर ६० वर्षांपुढील ६०४ जणांचा समावेश आहे. उर्वरित आरोग्यसेवक, पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून त्यात काहींना पहिला तर काहींना दुसरा लशीचा डोस देण्यात आला आहे.