रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ दिवसांचा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९० टक्क्य़ांवर पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी  ६९ दिवसांचा होता. तो आता ७७ दिवसांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर मृत्युदर २.७८ टक्क्य़ांवरून २.५६ टक्क्यांवर आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत एकूण ४४ हजार ९३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३९ हजार ७८८ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण १,११० जणांचा मृत्यू झाला. शहरात दररोज अडीच हजार करोना चाचण्या यापूर्वी करण्यात येत होत्या आणि त्यामध्ये सरासरी दोनशे रुग्ण आढळून येत होते. परंतु आता चाचण्यांची संख्या पाच हजारांहून अधिक चाचण्या होत असून त्यात सरासरी तीनशे ते साडेतीनशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णवाढीचा वेग पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. ऑगस्ट महिन्यात दररोज दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. या महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र होते. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्य़ांपर्यंत पोहचले होते. असे असतानाच सप्टेंबर महिन्यात पुन्हा रुग्ण वाढू लागल्यानंतर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घसरण होऊन ते ८५ टक्क्यांपर्यंत आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्य़ांपर्यंत पोहोचले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शहरात दररोज होणाऱ्या चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ११ टक्के होते. त्यातही सुधारणा होऊन ते १०.४२ टक्क्य़ांच्या आसपास आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील मृत्यूचा दरही कमी होऊन तो २.५६ टक्क्य़ांवर आला आहे.

रुग्ण दुपटीच्या कालावधीत सुधारणा

ऑगस्ट महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. त्यावेळेस रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवसांचा झाला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढू लागल्यानंतर त्यात घसरण होऊन तो ६० दिवसांवर आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यामध्येही सुधारणा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी आता ६९ दिवसांवर आला होता. तर, आता रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर आल्याचे चित्र आहे.

करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आणि त्याचबरोबर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. यामुळे करोनाबाधित रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना उपचार देणे शक्य झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्य़ांपर्यंत नेणे शक्य झाले आहे.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका