कांदळवन लागवडीसाठी मुंबई महापालिकेकडून शोध; भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील खाडीकिनाऱ्यांचा पर्याय

मुंबई शहरात खाडी बुजवून वा खारफुटी तोडून झालेल्या बांधकामाच्या क्षेत्रफळाएवढय़ा भूखंडावर खारफुटींची लागवड करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यानंतर मुंबई महापालिकेने आता कांदळवन लागवडीसाठी ठाणे जिल्ह्यातील खाडीकिनारे धुंडाळण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या विनंतीनंतर ठाणे जिल्हाधिकारी प्रशासनाने त्यांच्यासमोर भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे शहरातील खाडीकिनारी असलेल्या अविकसित जागांचे पर्याय ठेवले आहेत. त्यानुसार या जागांचे सर्वेक्षण करण्यात येत असून मुंबई महापालिकेच्या कांदळवन लागवडीमुळे ठाण्यातील खाडींचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत खाडी आणि समुद्रकिनारी भराव टाकून प्रचंड बेकायदा बांधकामे उभी करण्यात आली आहेत. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी संस्थांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर जनहित याचिका दाखल केल्या आहेत. यापैकी एका याचिकेवर सुनावणी करताना लवादाने अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेच्या क्षेत्रफळाएवढय़ा जागेवर कांदळवनांची लागवड करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. मात्र, मुंबईमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खाडीकिनारी जमिनी उपलब्ध नसल्याने महापालिकेने आता ठाणे जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील खाडीकिनारी जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुंबई महापालिकेने ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती.  त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि भिवंडी भागातील जमिनींचे प्रस्ताव तयार करून ते मुंबई पालिकेकडे पाठविले आहेत, असे महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. बोरिवली-गोराई भागात मुंबई पालिकेने खारफुटीचे पुनरेपण करून कांदळवनाचे जंगल फुलविले आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्य़ात कांदळवन फुलविण्याचा मुंबई पालिकेचा मानस असल्याचे समजते.

मुंबई पालिकेचे अधिकारी, कांदळवन लागवडीतील तज्ज्ञ, महसूल, वन विभागाचे अधिकारी येत्या काही दिवसात या ठिकाणांची पाहणी करणार असल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. खाडीकिनारची बहुतांशी जमीन सरकारी मालकीची, सागरी किनारा नियमन (सीआरझेड), हरित पट्टा (ग्रीन), झालर पट्टी (बफर झोन) प्रकारातील आहे. या जमिनींवर खाडीकिनारी कांदळवन तर काही जमीन पडीक आहे.

मुंबई पालिकेने पसंत केलेली ही पडीक जमीन जिल्हा महसूल विभाग शासनाकडून ताब्यात घेऊन स्थानिक महसूल, पालिका प्रशासनाच्या सहकार्याने मुंबई पालिकेकडे वर्ग करील.

जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या जमिनीवर खारफुटीचे पुनरेपण करण्याचे काम मुंबई पालिकेकडून सुरू होईल.

या उपक्रमाला महसूल, वन विभागाचे पूर्ण सहकार्य असेल, असे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पर्याय कोणते?

  • कळवा ते नवी मुंबईपर्यंतच्या परिसरात कांदळवनातील मोकळा भाग.
  • भिवंडी महसूल हद्दीतील सरवली, कोन परिसरातील खाडीकिनारची पडीक जमीन.
  • डोंबिवली पश्चिमेतील कोपर, रेतीबंदर ते कुंभारखाणपाडा, ठाकुर्ली खाडीकिनाऱ्याचा ओसाड भाग.

आदर्शवत पद्धतीने कांदळवन फुलविण्यासाठी महसूल विभागाने मुंबई पालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरातील खाडीकिनारचा अधिकाधिक पट्टा कांदळवन लागवडीखाली येईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, ठाणे