टाळेबंदी शिथिलीकरणानंतर अंतर नियमन धाब्यावर

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना अतिसंक्रमित क्षेत्र वगळून अन्य भागात टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे. मात्र, या शिथिलीकरणानंतर दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली असून या ठिकाणी अंतर नियमनांची ऐशीतैशी होत असल्याचे चित्र आहे. तसेच अशा दुकानदारांवर पालिका पथकाकडूनही कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, मोहने परिसरात दुकानदार सम, विषम तारखेप्रमाणे दुकाने सकाळी नऊ वाजता सुरू करतात. मात्र, त्यापूर्वीच दुकानांबाहेर ग्राहक गर्दी करत असल्याचे दिसून येते. दुकानातील सामान संपेल या भीतीपोटी ग्राहक ही गर्दी करीत आहेत. दुकानातील कामगार कामावर येत नसल्यामुळे दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्राहकांच्या गर्दीत एखादा करोनाबाधित रुग्ण असेल तर त्याच्यामुळे इतरांनाही करोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे दुकानांबाहेरील गर्दी रोखण्यास अपयशी ठरत असलेली दुकाने बंद करण्याची तसेच ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी दुकानाबाहेर दोरी बांधून नियोजन करण्याच्या सूचना दुकानदारांना देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

किराणा, मटण, मासळी आणि भाजीच्या दुकानांबाहेर रहिवासी सर्वाधिक गर्दी करीत असून या गर्दीला रोखण्यासाठी वेळीच नियोजन करून करोनाचा धोका कमी करण्याची गरज आहे. बहुतांशी भाजी विक्रेते, फेरीवाले पहाटे पाच वाजल्यापासून ते नऊवाजेपर्यंत रस्ते, गल्लीबोळात भाजी विक्रीसाठी बसतात. त्यापैकी एखादा विक्रेता करोना संसर्ग परिसरातून येत असेल तर त्याच्यामुळे इतर भागातही करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असे खासगी डॉक्टरांनी सांगितले.