सनसिटी-गास रस्ता महापालिकेच्या मालकीचाच नाही; ग्रामस्थांचा विरोध

वसई-विरार महापालिकेतर्फे सनसिटी-गास रस्त्यावर बांधण्यात येणारा सायकल ट्रॅक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जो रस्ता महापालिकेच्या मालकीचाच नाही, त्या रस्त्यावर महापालिका सायकल ट्रॅक कसा बांधू शकते, असा सवाल करत ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. महसूल खाते, सीआरझेड आदी कुणाचीही परवानगी न घेता हा सायकल ट्रॅक बांधला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण सागरी किनारा नियंत्रण क्षेत्रात येत असल्याने याच ठिकाणी महापालिकेने ११ कोटी रुपये बांधून उभारलेली सर्वधर्मीय दफनभूमी हरित लवादाच्या आदेशाने तोडावी लागली होती.

वसई पश्चिमेच्या सनसिटी येथून गास गावात जाणारा रस्ता महापालिकेने विकसित केला आहे. या रस्त्यावरून नालासोपारा आणि पुढे विरारला जाण्याचा मार्ग आहे. दिवाणमान, चुळणे आणि गास या गावांतून हा रस्ता जातो. मात्र ही खाजण जमीन असून गास गावातील अनेक शेतकऱ्यांची खासगी जमीन आहे. त्यामुळे गास गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करून रस्त्याला विरोध केला होता. अद्यापही या रस्त्याचे प्रकरण कायदेशीर प्रक्रियेत अडकलेले आहे. २०१३ पासून महापालिकेने या गावामधील खाजण आणि खासगी शेतकऱ्यांच्या जमिनीवरून अनधिकृत भराव करून टाकलेल्या रस्त्यावर खडीकरण, डांबरीकरण, पाइप कल्वर्ट, साइडपट्टी भराव, रस्ता डांबरीकरण, खाडय़ांवरील पूल अशा स्वरूपाची कामे केली आहेत. वेळोवेळी ग्रामस्थांनी विविध शासकीय संस्थांकडे तक्रारी केल्या होत्या. महापालिकेने केलेल्या भरावामुळे मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. येथील खाजण व खाडय़ा या समुद्राच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. खाजणीतील अनधिकृत बेकायदा भराव आणि खाडय़ांवरील पूल अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेले आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

या रस्त्याबाबत वाद असताना आता पालिका सनसिटी ते गास रस्त्यावर सायकल ट्रॅक बनवणार आहे. नुकतेच या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या कामासाठी साधारण ७२ लाख रुपये खर्च आहे. त्यामुळे आधीच पालिकेच्या विरोधात असलेल्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मुळात जो रस्ता पालिकेच्या मालकीचा नाही, त्या रस्त्यावर पालिका सायकल आणि जॉगिक ट्रॅक बनवूच कसे शकते, असा सवाल गास गावातील रहिवाशी अ‍ॅड. जिमी घोन्साल्विस यांनी केला आहे. या रस्त्याची गाव नकाशात नोंद नाही. विकास आराखडय़ात रस्ता नाही, एवढेच काय रस्त्याचा भूमापन क्रमांक पालिकेकडे नाही. मग पालिका कुठल्या आधारावर हा सायकल ट्रॅक बनवते, असा सवाल घोन्साल्विस यांनी केला आहे.

गास, चुळणे आणि दिवाणमान या तीन गावांतून हा रस्ता जातो. त्यापैकी चुळणे आणि दिवाणमानमधील रस्ता हा खारजमिनीतून गेलेला आहे. ती महसुलाची जागा आहे, तर गास गावातील रस्ता पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या जागेतून गेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळेच गास गावातील पूर्ण रस्ता पालिकेला विकसित करता आलेला नाही. पालिकेने कसलीच परवानगी घेतलेली नाही. जमीन हस्तांतरीत केलेली नाही, असाही आरोप घोन्साल्विस यांनी केला आहे.

महापालिकेने प्रशासकीय काम हे अधिकृत आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करणे अपेक्षित आहे. मुळात सनसिटी-गास रस्ता हा पालिकेच्या मालकीचा नाही. जनतेचा वापर होतो, म्हणून ग्रामस्थ विरोध करत नाही. परंतु आता महापालिकेने सायकल आणि जॉगिंग ट्रॅक तयार करायला घेतला आहे, याला आमचा विरोध आहे. महापालिकेने महसूल, सागरी किनारा नियंत्रण विभागाची परवानगी घेतलेली नाही.    – अ‍ॅड. जिमी घोन्स्लाविस, ग्रामस्थ, गास

पालिका सनसिटी रस्त्यावर कुठल्याच प्रकारचे बांधकाम करत नाही. केवळ रस्त्याचे रुंदीकरण करून त्यावर सायकल ट्रॅक उभारला जात आहे. सनसिटी येथे ज्या जागेवर सायकल ट्रॅक तयार होणार आहे, त्या रस्त्याच्या ३० मीटर रुंदीकरणाची परवानगी आहे. सायकल ट्रॅक हा त्याच रुंदीकरणाचा एक भाग आहे. विकास आराखडयात सनसिटी रस्त्याची नोंद आहे.     – राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका