नौपाडा, कोपरीतील मुख्य बाजारपेठा आज मध्यरात्रीपर्यंत बंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : पालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य परिसरात येत्या ५ जूनपासून जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील म्हणजेच नौपाडा तसेच कोपरी परिसरातील मुख्य बाजारपेठा आणि मोठय़ा आस्थापनांमध्ये नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठीच येत्या ४ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत हे परिसर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात केवळ औषधालये आणि दुधाची दुकाने खुली राहतील.

प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य परिसरात येत्या ५ जूनपासून जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी प्रभाग समिती स्तरांवर प्रशासनाकडून व्यापाऱ्यांसोबत बैठका घेतल्या जाणार आहेत. नौपाडा तसेच कोपरी भागांमध्ये गेल्या पाच दिवसांत १०० बाधित आढळले. यामुळे हे दोन्ही परिसर ४ जून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. असे असले तरी नौपाडा परिसरात ठाणे स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, जांभळीनाका भाजीपाला मंडई, खारकर आळी धान्य बाजार आहे. याशिवाय, गोखले रोड, घंटाळी रोड, राम मारुती रोड, तलावपाळी परिसर या ठिकाणी आस्थापना आहेत.

कार्यवाही कुठे?

ठाणे शहरातील नौपाडा, कोपरी परिसर पूर्णपणे बंद करण्यात आले असले तरी उथळसर, वर्तकनगर, माजिवाडा- मानपाडा, वागळे इस्टेट, लोकमान्य- सावरकरनगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागात गेल्या काही दिवसांत ठरवून दिलेल्या वेळेत जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, दूध आणि औषधांची दुकाने सुरू होती. या सर्वच भागात येत्या ५ जूनपासून सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

नौपाडा तसेच कोपरी परिसरात सम-विषम पद्धतीने बाजारपेठा आणि आस्थापना सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हे दोन्ही परिसर ४ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवले आहेत.

-संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision to start shops other than essentials from 5th june on an even odd basis zws
First published on: 04-06-2020 at 03:18 IST