03 April 2020

News Flash

बदलत्या जीवनशैलीमुळे खेळणाऱ्यांची संख्या घटली

वाढत्या शहरीकरणात वेगाने बदलणारे बदलापूर कात टाकत असले तरी पूर्वीच्या या गावाचे गावपण मात्र मागे पडत आहे.

| August 4, 2015 01:22 am

वाढत्या शहरीकरणात वेगाने बदलणारे बदलापूर कात टाकत असले तरी पूर्वीच्या या गावाचे गावपण मात्र मागे पडत आहे. अनेक बदलांची नवी वस्त्रे परिधान करण्यात मग्न असलेल्या या शहरातील परंपरा मात्र विस्मृतीत जात आहेत. या शहराचा ऐकेकाळी पारंपरिक खेळ असलेला खो-खो आता शहरातून हद्दपार झाल्यात जमा आहे. चपळाई, वेगाने झडप, पाठलाग असे वर्णन असलेल्या खो-खो हा क्रीडा प्रकार तीन दशके बदलापूरचा अविभाज्य घटक होता. मात्र एकेकाळी खो-खोचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या या शहरात सध्या कुणीही हा खेळ खेळताना आढळत नाही.
बदलापूर शहर हे सात-आठ महसूल गावे एकत्र येऊन झालेले शहर आहे. सत्तरच्या दशकात या गावांमधील युवा पिढी खो-खोने पछाडलेली होती. म्हणूनच कुळगांव, आगरआळी, स्टेशनपाडा या भागातील खेळाडूंनी प्रथम १९६७ साली राज क्रीडा मंडळ व १९६८ साली समर क्रीडा या फक्त खो-खो खेळणाऱ्या मंडळांची स्थापना केली. त्यांच्या पाठोपाठ हेंद्रेपाडा येथे विजय क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ व ज्युवेली येथे शिवगर्जना मित्र मंडळ आदींची स्थापना झाली. खो-खोच्या तुफान चपळाईचे सराव त्या काळी कुळगाव येथील मराठी शाळेचे मैदान, गावदेवी मैदान आणि आदर्श शाळेच्या मैदानात सुरू असत. मुंबई व पुणे जिल्ह्याच्या संघांचा सामना, बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस, रिझर्व बँक आदींच्या सामन्यांचे आयोजन बदलापुरात केल्याची माहिती ज्येष्ठ खो-खोपटू अविनाश खिलारे यांनी दिली.
१९७६ ते १९९६ खो-खोचा सुवर्णकाळ
बदलापुरात या काळात केवळ बदलापूरच नव्हे तर, राज्य व राष्ट्रीय संघातही बदलापूरच्या खेळाडूंचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाच्या खो-खोच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या १९७५-७६ सालच्या अखिल भारतीय भाई नेरुरकर स्पर्धेत येथील राज क्रीडा मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला होता. या काळात तब्बल १० राष्ट्रीय खेळाडू व १००च्यावर राज्यस्तरीय खेळाडू, ८ ते १० राज्यस्तरीय पंच व २ राष्ट्रीय पंच बदलापुरात होते. सचिन वाघमारे यांनी महाराष्ट्राचे कर्णधारपद, कै. लक्ष्मण राऊत महाराष्ट्र कुमार संघाचे कर्णधार, मोहन भिडे, कै. मनोहर मुठे यांनी मुंबई विद्यापीठात प्रतिनिधित्व केले. हेमंत घाग, चेतन शेलार व संजय क्षीरसागर, अनिल भोईर, समीर भोपी आदींनीदेखील राष्ट्रीय संघात खेळ केला. सुरेश कोंडीलकर या स्थानिक खो-खो महर्षीच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू बदलापुरात झाले. अशी माहिती राष्ट्रीय पंच व खो-खोच्या ठाणे जिल्हा असोसिएशनचे कोषाध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले.
खो-खोपटू आजी-माजी नगरसेवक
राम पातकर, राजेंद्र घोरपडे, संजय गायकवाड, अविनाश पातकर, जयवंत मुठे, संदेश पातकर, चारुदत्त गानू, अविनाश भोपी आदी आजी-माजी नगरसेवक यांनी राज्यस्तरीय खेळाडू म्हणून महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
खेळ विस्मृतीत का गेला?
त्या वेळी खो-खोपटूंना आत्तासारख्या शासकीय नोकऱ्या मिळत नव्हत्या. फक्त चषक व प्रमाणपत्रे मिळत असत. मात्र आजच्यासारखी रोख बक्षिसे मिळत नसल्याने उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होत असे. त्यामुळे आत्ता पन्नाशीत आलेल्या पिढीने त्या वेळी खेळाला प्राधान्य दिले, मात्र नंतरच्या पिढीने या खेळाकडे पाठच फिरवली. असे अविनाश खिलारे व किशोर पाटील यांनी सांगितले. दरम्यान, नगरपालिकेनेही आजवर खो-खोचा एकही सामना अथवा प्रोत्साहन न दिल्यानेही खो-खो पुनरुज्जीवित होऊ शकला नाही, असेही अनेकांनी चर्चेदरम्यान सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2015 1:22 am

Web Title: decline in the number of feature changing lifestyle
टॅग Lifestyle
Next Stories
1 जुलै उलटला तरी बारवी धरण अर्धेच
2 मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी निर्णय शाहीस्नानासाठी भिवंडीत गोदामबंदी
3 किडुकमिडुक दुरुस्त्यांचा ‘सेवा बाजार’
Just Now!
X