बदलापूर : बदलापूर आणि अंबरनाथमध्ये करोना संशयित आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणी अहवालांची प्रतीक्षा वाढत असल्याचे चित्र आहे. दोन्ही शहरांतील संशयितांचे चाचणी अहवाल येण्यासाठी किमान चार ते आठ दिवसांपर्यंतचा वेळ लागत आहे.  पालिकांमधून मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथमध्ये सध्या ४० चाचण्यांचे अहवाल येणे शिल्लक आहे. तर बदलापुरातही तब्बल ६१ जणांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे बदलापूर आणि अंबरनाथमधून रोज सुमारे २५० बसगाडय़ांमधून रुग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील सफाई कामगार, परिचारिका, बँकेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मिळून चार ते पाच हजार जण मुंबई आणि उपनगरांमध्ये जात असतात. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतील अनेक सदस्यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रोज सरासरी १५ ते २० जणांचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील रुग्णालयांत पाठवले जातात. मात्र, त्यांचा अहवाल येण्यासाठी अधिकचा वेळ जात असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. अंबरनाथमधल्या पहिल्या करोनाबाधिताच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा अहवाल येण्यासाठी १३ दिवस लागले होते.

कधी अहवाल, कधी निरंक

सोमवारी अंबरनाथमधील एकूण ६४ चाचण्यांचे अहवाल एकाच दिवशी प्राप्त झाले होते. तर अनेकदा एकही चाचणीचा अहवाल प्राप्त होत नाही. त्यामुळे अलगीकरण कक्षात बाधित नसलेल्या व्यक्तींचाही मुक्काम वाढत आहे.