१३ हेक्टर जमिनीवर पोलीस ठाणे, मंडई, रुग्णालय, अग्निशमन केंद्राची उभारणी
रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरासाठी आरक्षित असलेली दिवा परिसरातील आगासन विभागातील सुमारे १३.८७ हेक्टर इतकी विस्तीर्ण जागा राज्य सरकारने अखेर ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या आरक्षण बदलामुळे नियोजनाच्या आघाडीवर मागासलेल्या दिव्यात पोलीस ठाणे, मार्केट, रुग्णालय, अग्निशमन केंद्र तसेच सुसज्ज अशा वाहनतळाच्या जागा विकसित करणे आता महापालिकेस शक्य होणार आहे. ठाणे शहराच्या धर्तीवर दिव्यातही बांधीव विकास हस्तांतरण हक्काचा वापर करून या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
दिवा आणि परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून या भागात विविध सुविधा पुरविण्यासाठी नव्या जागांचा शोध सुरू केला आहे. महापालिकेच्या विकास आराखडय़ात आरक्षित असलेल्या जमिनींचे मूळ आरक्षण बदलून नव्याने सुविधा उपलब्ध करून देता येतील का याची चाचपणी शहर विकास विभागाने सुरू केली होती. महापालिकेच्या विकास योजनेत सेक्टर १० भागात मोडणाऱ्या आगासन परिसरातील १३.८७ हेक्टर जमीन ‘इंडियन रेल्वे वेल्फेअर ऑर्गनायझेशन’साठी आरक्षित ठेवण्यात आली होती. या जागेवर रेल्वेतील कर्मचाऱ्यांसाठी घरे उभारण्यात येतील, असे गृहीत धरण्यात आले होते. मात्र, विकास योजना मंजूर होऊन १७ वर्षे लोटली तरी या जागेवर घरे उभारण्यासंबंधी रेल्वे प्रशासनाकडून फारसा पुढाकार घेण्यात आला नव्हता. त्यामुळे या जागेचे मूळ आरक्षण बदलून त्यावर दिवा, आगासन भागातील रहिवाशांसाठी विविध सुविधांची उभारणी व्हावी, असा प्रस्ताव एप्रिल २०१७ मध्ये महापालिकेच्या शहर विकास विभागाने तयार केला होता. सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. आठ महिन्यानंतर या प्रस्तावास नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखविला.
सुधारित आरक्षण फेरबदलानुसार आगासन भागात पोलीस ठाणे, बस स्टॅण्ड, मार्केट, जलकुंभ, प्रभाग कार्यालय, रुग्णालय, पार्किग आणि अग्निशमन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व सुविधा उभारताना याच जागेवर १५ मीटर रुंदीचा रस्ता उभारला जाणार आहे. दिव्यातील एका भागात एवढय़ा सुविधांचा विकास प्रथमच होत असून या भागातील रहिवाशांना सुविधांचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचे प्रमुख प्रमोद िनबाळकर यांनी लोकसत्ताला दिली.
दिव्यातील विकासाच्या दृष्टीने हा प्रस्ताव मंजूर होणे अत्यंत महत्त्वाचे होते. यापुढे या सुविधांचा विकास करताना बांधीव विकास हस्तांतरण हक्काचा वापर केला जाईल. ठाणे शहरात या माध्यमातून अनेक सुविधांचा विकास झाला आहे. असाच प्रयोग दिवा आणि आगासन भागात केला जाईल. दिव्यात सुविधांचा मार्ग या निर्णयामुळे सरकारने खुला केला आहे.
– संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका