करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आता महापालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारवर शरीर र्निजतुकीकरण यंत्र बसविले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे यंत्र बसविण्यात आले असून ही यंत्रे प्रभाग समिती कार्यालयांमध्ये बसविण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. या यंत्रामधून प्रवेश केल्यानंतर आपोआपच शरीर र्निजतुकीकरण केले जात असून यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ इतकी झाली असून कळवा परिसरात सर्वाधिक म्हणजेच १० रुग्ण आढळले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसर औषधालये वगळता पूर्णपणे टाळेबंद केला आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत, तो परिसरही पालिकेने पूर्णपणे बंद केला आहे. या परिसरासह इतर भागातील नागरिकांनीही घराबाहेर पडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय दुकानदारांची मोबाइल क्रमांकासह यादी प्रसिद्ध केली असून त्याद्वारे घरपोच साहित्य मागविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर ठाणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय पथके कार्यरत असून या सर्वाना महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयात दररोज जावे लागते. यापैकी कुणालाही करोनाची बाधा होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने मुख्यालय इमारतीत शरीर र्निजतुकीकरण यंत्र बसविले आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी बोरोप्लास्ट या कंपनीने हे यंत्र तयार केले असून हे यंत्र प्रायोगिक तत्त्वावर मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आले आहे. यापूर्वी महापालिकेने ताप तपासणी यंत्रणा मुख्यालय प्रवेशद्वारावर ठेवली असून त्यापाठोपाठ आता ही यंत्रे ठेवली आहेत.

दहा सेकंदात शरीर निर्जंतुकीकरण

या यंत्रामध्ये ५०० लिटर पाण्याची टाकी लावून त्यात पॉलिमेरिक बेक्युनाइड हैड्रोक्लोराइडचे ०.५ टक्के हे प्रमाण वापरून र्निजतुकीकरण करण्यात येते. या अत्याधुनिक यंत्रामध्ये व्यक्तीने प्रवेश केल्यानंतर सेन्सर कार्यान्वित होऊन आपोआपच स्प्रे सुरू होतो. त्यानंतर दहा सेकंदांमध्ये  संपूर्ण शरीर र्निजतुकीकरण केले जाते.

भाजीपाला बाजारात र्निजतुकीकरणानंतरच प्रवेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण असलेल्या एपीएमसीतील भाजीपाला बाजारात करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेत एपीएमसी प्रशासनाने भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारावर र्निजतुकीकरण यंत्र बसविले असून बाजारात सर्व घटकांना शरीर र्निजतुकीकरण केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

गर्दीचा धोका लक्षात घेत येथील व्यापाऱ्यांनी टाळेबंदीनंतर हे मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजीपाला हाही अत्यावश्यक सेवेत मांडत असून हा बाजार बंद राहिला तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भाजीपाल्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शासनाने हा बाजार सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा बाजार सुरू करण्यात आला, मात्र येथील गर्दीवर नियंत्रण कठीण होत आहे. एपीएमसी प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने काही नियम लागू करीत गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या बाजारात लोकांची मोठी वर्दळ राहणारच आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाय म्हणून प्रशासनाने भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारावर हे र्निजतुकीकरण यंत्र बसविले आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे र्निजतुकीकरण केले जात आहे.

याशिवाय बाजारात वाहनांवर जंतुनाशक फवारणी, प्रवेशद्वार नागरिकांना मास्क व हात स्वच्छ धुण्याची व्यवस्थाही  करण्यात आली आहे. तसेच सामाजिकअंतर ठेवण्यासाठी विशिष्ट अंतरावर लाकडी गतिरोधक लावण्यात आले आहेत.

बाजार आवारात अनेक ठिकाणांहून नागरिक ये—जा करीत असतात. त्यामुळे या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचे र्निजतुकीकरण होणार आहे.

अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी