लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : करोनाच्या टाळेबंदीने गडगडलेल्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वेगाने सावरलेल्या वाहन क्षेत्रामधील तेजीचे वातावरण सणासुदीत कायम आहे. दसऱ्याच्या मुहूर्तापासून तेजीत आलेल्या जिल्ह्य़ातील वाहनविक्रीच्या व्यवसायात दिवाळीच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्य़ात ३ हजार ५१ वाहनांची विक्री झाली आहे. या वाहनांच्या विक्रीमुळे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना तब्बल १० कोटी ६९ लाख ५४ हजार ५९२ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वाहनविक्रीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. याच काळात आलेल्या गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया या दोन्ही मुहूर्तावर वाहनांची विक्री ठप्पच होती. याचा मोठा फटका विक्रेत्यांना बसला होता. वाहनांची विक्री बंद असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या महसुलातही मोठी घट झाली असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, टाळेबंदीत शिथिलता आल्यामुळे वाहनविक्रीचा व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. गेल्या महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्य़ात १ हजार ८४ वाहनांची विक्री झाली होती. या वाहनविक्रीतून ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना २ कोटी २४ लाख १९ हजार ५०७ रुपयांचा महसूल मिळाला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर या व्यवसायात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्य़ात ३ हजार ५१ वाहनांची विक्री झाली आहे. त्यामध्ये ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ६२७ वाहनांच्या विक्रीची नोंदणी झाली असून कार्यालयाला ४ कोटी ६२ लाख ५१ हजार ५६ रुपयांचा महसूल, तसेच नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय क्षेत्रातून ५०७ वाहनांची विक्री झाली असून कार्यालयाला २ कोटी १५ लाख ९ हजार ५६६ रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर कल्याण उपप्रादेशिक क्षेत्रात सर्वाधिक १ हजार ९१७ वाहनांची विक्री झाली असून कार्यालयाला ३ कोटी ९१ लाख ९३ हजार ९७० रुपयांचा महसूल मिळाला आहे.

मालवाहू, अवजड वाहनांनाही मागणी

जिल्ह्य़ात विक्री झालेल्या ३ हजार ५१ वाहनांमध्ये २ हजार ३६६ दुचाकी आणि ५१५ कारचा समावेश आहे. असे असले तरी दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्य़ामध्ये १०० हून अधिक जड-अवजड मालवाहू वाहनांची विक्री झाली आहे. या वाहनांच्या कराची रक्कम मोठी असल्यामुळे उपप्रादेशिक कार्यालयांच्या महसुलात वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये सर्वाधिक ४९ जड-अवजड वाहनांची विक्री ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय क्षेत्रातून झाली आहे, तर जिल्ह्य़ात तीनचाकी प्रवासी आणि मालवाहू गाडय़ांच्या विक्रीतही वाढ झाली असल्याचे कार्यालयांकडून सांगण्यात आले आहे.