केंद्रातील सरकार करत असलेली विकासकामे, विविध योजना आणि उपक्रमांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी भाजपच्या वतीने आयोजित ‘विकासपर्व’ कार्यक्रमाकडे डोंबिवलीकरांना सपशेल पाठ फिरवली. पक्षाचे मोजके कार्यकर्ते वगळता सभागृहातील बऱ्याचशा खुच्र्या रिकाम्या होत्या. उपस्थित कार्यकर्तेही पेंगत अथवा मोबाइलवर खेळत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे केंद्रातील सरकार करीत असलेली विकासकामे, योजना व उपक्रम यांची माहिती जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकासपर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रम तब्बल एक तास उशिरा सुरूझाल्याने कार्यकर्ते व इतर उपस्थित तुरळक नागरिक आधीच कंटाळले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या वतीने कामांची चित्रफीत व त्यावरील माहिती प्रेक्षकांना वाचून दाखविली. रटाळपणे सुरू असलेल्या या कार्यक्रमात काहीच रस नसल्याचा सूर उमटत होता. माजी मंत्री जगन्नाथ पाटील उपस्थित होते.