मूठभर रिक्षाचालकांचा आडमुठेपणा सुरूच

डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर रेल्वे प्रवेशद्वार, स्वच्छतागृहाजवळ रस्ता अडवून प्रवाशांना त्रास देण्याचे प्रकार या भागात अजूनही सुरू आहेत. या ठिकाणी व्यवसाय करू नका, असा दम वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा रिक्षाचालकांना भरला आहे. काही वेळा त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. तरीही काही रिक्षाचालकांचा आडमुठेपणा अद्याप सुरू असून वाहतूक पोलिसांनीही या दादागिरीपुढे हात टेकल्याचे चित्र दिसू लागले आहे.

गेल्या आठवडय़ात शनिवारी शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी विष्णुनगर रेल्वे प्रवेशद्वार आणि स्वच्छतागृह प्रवेशद्वाराजवळ दोन तास टेहळणी केली. या प्रवेशद्वारावर कोणते रिक्षाचालक येऊन नियमबाह्य़ प्रवासी वाहतूक करतात, रस्ता अडवतात याचीही पाहणी करण्यात आली. रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्या या रिक्षांचे क्रमांक सामाजिक कार्यकर्त्यांनी लिहून घेतले. एक ते दीड तासाच्या पाहणीत रिक्षाचालकांची दादागिरी सुरूच असल्याचे दिसून आले. अनेक उत्तरभाषिक रिक्षाचालक सुट्टीनिमित्त गावी निघून गेले आहेत. त्यामुळे या मंडळींनी आपल्या रिक्षा मूळ मालकाला किंवा भाडय़ाने दिल्या आहेत. या रिक्षांवर स्थानिक उडाणटप्पू तरुण आपला भ्रमणध्वनी, नेटपॅक, रात्रीच्या बैठकीचा खर्च जमविण्यासाठी व्यवसाय करीत असल्याचे या क्षेत्रातील एका व्यावसायिकाने सांगितले.

स्थानकाच्या प्रवेशद्वारात रिक्षा उभ्या करणे प्रवाशांना त्रास देत आहेत. अनेक महिन्यांपासून हा उपद्रव सुरू आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकांचे क्रमांक वाहतूक पोलीस अधिकारी, ईगल ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर यांच्या स्वाधीन केले आहेत. या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे या रिक्षाचालकांची तक्रार करण्यात येणार आहे.

अडवणूतदारांचे क्रमांक..

एमएच ०५ सीजी ६६५१, एमएच ०५ बीजी ६४४८, एमएच ०५ आर ६०००, एमएच ०५ झेड ७१३२, एमएच ०५ सीजी ७८७, एमएच ०५ बीजी ३९२६, एमएच ०५ बीजी ३८२३, एमएच ०५ सीजी ४१२४, एमएच ०५ बीजी ९१४२.