मास्क न घातल्याबद्दल कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर कुत्रा सोडल्याची धक्कादायक घटना डोंबवलीमध्ये घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केलीय.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक ठिकाणी आजही नागरिक मास्क न घालता फिरताना दिसतात.अशा बेजबाबदार नागरिकाविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केलीय .मात्र बेजबाबदार नागरिक अनेकदा कारवाई दरम्यान पोलीस आणि पालिकेच्या पथकाशी हुज्जत घालतात. डोंबिवली मध्ये काल एक असाच विचित्र प्रकार घडलाय. डोंबिवली खंबाळ पाडा रोडवर महापालिका व पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. याच दरम्यान एका गॅरेजच्या बाहेर तिघेजण मास्क न घालता उभे असल्याचं आढळून आलं. या तिघांवर कारवाई करताना तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. इतकंच नव्हे तर पाळलेला कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी तायडे यांच्या पायाला दुखापत झाली.

या प्रकरणी डोंबिबली पोलीस ठाण्यात आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता,आदित्य गुप्ता विरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक जे. डी. मोरे यांनी दिलीय.