दोन महिन्यांत पाडकाम; उर्वरित दोन्ही पूल नागरिकांसाठी खुले करणार
डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण बाजूकडील पादचारी पूल धोकादायक ठरल्याने तो येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येणार आहे. हा पूल सर्वासाठी खुला असल्याने डोंबिवलीकर नागरिक याच पुलाचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. मात्र पूल पाडल्यानंतर नागरिकांना पूर्व-पश्चिम प्रवास करण्यात अडचणी येणार आहेत. हा विचार करून स्थानकातील रेल्वे प्रवाशांसाठीचे दोन्ही पूल सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने केला आहे.
डोंबिवली स्थानकातून दररोज तीन लाख प्रवासी प्रवास करतात. या स्थानकात तीन पादचारी पूल आहेत. यापैकी कल्याण दिशेकडील पूल ४० वर्षे जुना असून त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पुलाखालून लोकल गेली तरीही हा पूल हादरतो, असा प्रवाशांना अनुभव आहे. या पुलाची डागडुजी करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने नेमलेल्या पाहणी समितीने हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. तसेच हा पूल दोन महिन्यांत पाडण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार या पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गर्दीचे जवानांकडून नियोजन
हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला असल्याने त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम या भागांकडे जाणारे नागरिक या पुलाचाच वापर करतात. अवघ्या साडेचार मीटर रुंदीचा हा पूल गर्दीसाठी अपुरा पडतो. त्यामुळे दररोज सकाळ, संध्याकाळी रेल्वेच्या सुरक्षा बलाचे जवान येथे हाती दोऱ्या घेऊन प्रवाशांचे नियोजन करतात. आता हा पूल पाडण्यात येणार असल्याने रेल्वेने स्थानकातील अन्य दोन पूल नागरिकांसाठी खुले करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या पुलाचे बांधकाम सुरू होताच मध्यभागी असलेले पूल इतर प्रवाशांसाठी खुले करून दिले जातील, अशी माहिती डोंबिवली स्थानकातील एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.