महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या वेडेपणाची मांदियाळी असून आपल्या मनातील अस्वस्थता कार्यकर्ता रचनात्मक काम करुन व्यक्त होत असतो. मात्र संक्रमण काळात त्यांना समाजाने समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी येथे केले.
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी येथील सुयोग मंगल कार्यालयात डोंबिवलीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर चक्रदेव यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सामाजिक कार्यकर्त्यांची मानसिकता या विषयावर देवधर यांनी विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अंजली चक्रदेव, सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे, मधुकर चक्रदेव आदि मान्यवर उपस्थित होते. मधुकर चक्रदेव यांचा यावेळी शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
देवधर पुढे म्हणाले, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते चिंचोक्याचे चटके खाऊनही काम करत असतो. तोही एक माणूस असून त्याच्याही हातून चुका होऊ शकतात. त्यावेळी त्यांना समजून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यकर्त्यांला एकही लाईक मिळत नाही, तरी तो काम करत असतो. त्यांना केवळ सामाजिक आधाराची गरज असते. कार्यकर्ते हा दुर्बल घरातून तयार होत असतो, सक्षम घरातून नाही. तो एका कुकरच्या शिट्टीसारखा असतो. त्याच्या अस्वस्थतेला दाद दिली पाहिजे असेही ते म्हणाले.