युवा इंग्रजी लेखक सुदीप नगरकर याची खंत
फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांमुळे खऱ्या मैत्रीची मूल्ये लोप पावत आहेत. नव्याने होणाऱ्या समाजमाध्यमांवरील मित्रांपेक्षाही जुने खरे मित्र जोडून ठेवणे आजच्या काळाची गरज झाली आहे, अशी खंत इंग्रजीतील सुप्रसिद्ध युवा लेखक सुदीप नगरकर यांनी बोलून दाखविली.
ठाण्यात इंद्रधनू-रंगोत्सवातील शब्दयात्रा कार्यक्रमादरम्यान रविवारी आयोजित केलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे नगरकर प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले की, माझ्या पुस्तकातील व्यक्तिरेखा या माझ्या आजूबाजूच्याच आहेत. माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या व नोकरीच्या विश्वातील व्यक्तिरेखांचा प्रभाव हा माझ्या पुस्तकातील व्यक्तिरेखांवर पडला आहे. तसेच समाजावर माध्यमांचा खूप प्रभाव आहे. प्रेम, मैत्री, मैत्रीची मूल्ये याचे प्रदर्शन मी माझ्या लेखनातून मांडत आलो आणि प्रत्येक पुस्तकातून वेगळा संदेश देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
या वेळी पुस्तकांच्या हलक्या व खोटय़ा प्रतींच्या विक्रीवर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, खोटय़ा व हलक्या प्रतींची रस्त्याच्या कडेला मिळणारी पुस्तके यातून नेहमीच लेखकाचे खरे लिखाण वाचकांपुढे येत नाही. त्यातून वाचकांची बहुतेकदा फसवणूकच होते.
अभियांत्रिकीत अनुत्तीर्ण झाल्यावर लेखनाकडे वळलो. मैत्रिणीशी प्रेमसंबंध तुटल्यावर मी खचलो होतो. त्यात मी दोन वर्षे अभियांत्रिकी शिकताना नापास झाल्याने घरीच बसावे लागले होते. त्या अतिताणाच्या काळात मी डायरी लिहायला लागलो. एका मित्राने डायरी वाचली आणि तो म्हणाला की, ही डायरी प्रकाशकांकडे दे, ते पुस्तक छापतील. अखेर मित्राच्या आग्रहानंतर मी आठ-नऊ प्रकाशकांना भेटल्यानंतर एका प्रकाशकांनी हे पुस्तक छापण्याचे ठरवले आणि माझे ‘फ्यू थिंग्स लेफ्ट अनसेड’ हे पुस्तक प्रकाशित झाले. पहिल्याच महिन्यात त्याच्या वीस हजार प्रती संपल्या असून आजपर्यंत त्याच्या दोन लाखांवर प्रती संपल्या आहेत. त्यामुळे इथून पुढील काळात पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या ही वाढत जाणार, असे ते आत्मविश्वासाने म्हणाले.