रोजच्या जेवणासाठी सर्वसामान्यांची जास्तीची पदरमोड

मानसी जोशी, पूर्वा साडविलकर

ठाणे : जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाल्यानंतरही पावसाला सुरुवात न झाल्याचा परिणाम भाजीबाजारात दिसू लागला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील भाजीपाल्याची आवक घटल्याने सर्वच भाज्यांच्या दरांत किलोमागे सरासरी पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. पालेभाज्यांच्या दरांत तर जुडीमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. एकीकडे शाकाहार महागला असताना जिवंत कोंबडीच्या दरांतही किलोमागे दहा तर अंडय़ांच्या दरात नगामागे एका रुपयाची वाढ झाल्याने सामान्यांना रोजच्या जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

सद्य:स्थितीत किरकोळ बाजारात पालक भाजीची प्रतिजुडी १५ रुपये, शेपू ३० रुपये, मेथी ३० रुपये आणि कांद्याच्या पातीची विक्री ३० रुपये दराने होत आहे. नाशिक, अहमदनगर, वसई आणि पुणे या भागातून वाशी, कल्याण येथील घाऊक बाजारपेठांमध्ये पालेभाज्या विक्रीसाठी येत असतात. नाशिक आणि पुणे भागात पावसाळ्यापूर्वीची पाणीटंचाई तसेच जून महिना उजाडला तरी पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नसल्याने या भागात पालेभाज्यांचे उत्पन्न कमी झाल्याचे शेतकरी प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. एक ते दीड महिन्यापूर्वी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात दररोज भाज्या वाहून आणणाऱ्या ६०० मालवाहू गाडय़ा येत होत्या. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक रोडावली असून सद्य:स्थितीत जेमतेम ५०० वाहनांच्या आसपास आवक होत आहे.

पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे त्यांचे दर मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पालकच्या एका जुडीची किंमत घाऊक बाजारात ७ रुपये एवढी होती तर आता ९ रुपये अशी आहे. किरकोळ बाजारात १० रुपयांनी विकला जाणारा पालक आता १५ ते २० रुपये जुडी दराने ग्राहकांना विकत घ्यावा लागत आहे. शेपू, मेथी आणि कांद्याच्या पातीच्या जुडीच्या दरांतही जुडीमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे.

एकीकडे, भाज्यांची दरवाढ सर्वसामान्यांचे रोजचे जेवण महाग करत असताना सामिष खाणाऱ्यांनाही आपल्या जिभेला आवर घालावा लागत आहे. वांगणी, पुणे, नाशिक, नगर परिसरातील पोल्ट्रीतील अनेक कोंबडय़ा उन्हाच्या तडाक्याने दगावल्याने शहरांतील कोंबडय़ांची आवक कमी झाली आहे. बाजारातील मागणी मात्र कायम असल्याचा परिणाम कोंबडीच्या दरवाढीत झाला आहे. सध्या जिवंत ब्रॉयलर कोंबडी १४० तर गावठी कोंबडी २४० रुपये किलोने विकली जात आहे. आवडाभरापूर्वी या दोन्हींचे दर दहा रुपये कमी होते, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक राहुल देशमुख यांनी दिली. वातावरणातील तापमान कायम असल्याने याचा फटका अंडय़ांनाही बसत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. महिनाभरापूर्वी अंडय़ाची विक्री प्रतिनग ४.५० रुपये दराने होत होती. सध्या अंडय़ाची विक्री प्रतिनग ५.३० रुपये दराने होत आहे.

कोथिंबीरही महागली

दहा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची किंमत ५० रुपये एवढी होती, तर आता ९० रुपये दराने कोथिंबिरीची विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात दहा दिवसांपूर्वी मोठय़ा जुडीची किंमत ही ५० रुपये होती. सध्या ती ९० ते १२० इतकी झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

पाणीटंचाईचा फटका पालेभाज्यांना बसल्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून पालेभाज्यांच्या विक्रीत प्रतिजुडी १० रुपयांची वाढ झाली आहे. या महिन्याच्या अखेपर्यंत ही महागाई कायम राहण्याची शक्यता आहे.

– राजू पाटील, किरकोळ भाजी विक्रेता