डोंबिवलीत आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने विशेष मुलांसाठी इको फ्रेंण्डली गणेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डोंबिवलीतील सेंट जोसेफ शाळेतील विशेष मुलांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इको फ्रेंण्डली गणेशमूर्ती कशी साकारायची, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे व निर्माल्यामुळे होणारे जलप्रदूषण, त्यातून जलचर प्राण्यांना होणारा त्रास याविषयी माहिती या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुलांना समजावून सांगण्यात आली. शाडूच्या मातीची गणेशमूर्ती साकारणे त्याची प्राणप्रतिष्ठा करणे, गणेश विसर्जनानंतर त्या मातीचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो तसेच निर्माल्यापासूनही आपण खत निर्मिती कशी करू शकतो याविषयीही माहिती देण्यात आली. नेहमीच आपल्या भावविश्वात रमणारे हे चिमुकले गणेशमूर्ती साकारताना तल्लीन झाले होते. यावेळी यापैकी अनेकांनी सुरेख अशा मूर्ती साकारल्या. मातीत खेळण्याचा त्यांचा एक वेगळा आनंद यातून दिसून आला. शहरातील असंख्य विशेष मुलांपर्यंत अशा संस्थांनी पोहोचले पाहिजे. तसेच त्यांनाही अशा वेगवेगळ्या कलाकृती साकारण्याचा आनंद दिला पाहिजे असे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना रॉड्रिग्ज यांनी सांगितले. तर संस्थेचे संस्थापक विनोद शेलेकर म्हणाले, या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे आम्ही प्रदर्शन भरविणार आहोत. त्यांच्या कलेला नवा आयाम देण्याचे काम करत आहोत.