05 March 2021

News Flash

ठाण्याची विद्यादानाची परंपरा

ठाणे जिल्ह्य़ातील अनेक शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शिक्षण देण्यामध्ये नावाजल्या गेल्या आहेत. ठाणे शहराने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्तिमत्त्वे घडवली. ज्या शाळांमधून हे मान्यवर घडले

| July 31, 2015 01:19 am

ठाणे जिल्ह्य़ातील अनेक शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शिक्षण देण्यामध्ये नावाजल्या गेल्या आहेत. ठाणे शहराने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्तिमत्त्वे घडवली. ज्या शाळांमधून हे मान्यवर घडले अशाच ठाण्यातील जुन्या शाळांचा हा वेध..
शिव समर्थ विद्यालय
स्थापना– १ जुलै १९१६
संस्थापक– हरिभाऊ घाणेकर, दत्तात्रय दामले व त्यांचे सहकारी भजन मंडळींनी या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. प्र. शं. साठे (मास्तर), चिं. पां. लागू मास्तर, रा. शं. साठे (तात्या), प्र. ज. हजारे (अप्पा) या तालमीतल्या मंडळींनी १९४० ते २००० या कालावधीत ही संस्था वाढवली. विद्यमान अध्यक्ष अनिल हजारे आणि सरचिटणीस निशिकांत साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पारंपरिक कार्य अखंडितपणे सुरू आहे.
वैशिष्टय़े– देशभक्ती, समाजासाठी काम करण्याची वृत्ती जोपासण्याचे शिक्षण देणारी ठाण्यातील शिव समर्थ विद्यालय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अन्य काही गोष्टीही शिकविते. शिक्षण आणि संस्कारांचे धडे देणाऱ्या नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा या उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाने अनेक वक्ते घडविले आहेत. वक्तृत्व स्पर्धा, पालक शिबीर, वार्षिक स्नेहसंमेलन, शिक्षक दिन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ आदी कार्यक्रम दर वर्षी होतात. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी देशभक्तीची ज्योत तरुणांमध्ये प्रज्वलित केली जाते. १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ठीक १२ वाजता झेंडावंदन करून स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना उजाळा दिला जातो. मंडळाचा प्रत्येक सदस्य कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असतो आणि सढळ हस्ते स्वअर्थार्जन करीत असतो.
ब्राह्मण विद्यालय
स्थापना– १९३५ पासून ब्राह्मण संस्थेच्या विविध शाळा ठाण्यात सुरू झाल्या.
वैशिष्टय़– ठाणे शहरातील अग्रगण्य शाळांमध्ये या विद्यालयाचा समावेश होत असून मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच शिस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वतीने प्रयत्न केला जातो. मुलांना सणांची ओळख व्हावी या उद्देशाने वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम संस्थेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. घंटाळी, वर्तकनगर, चरई अशा ठाण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये संस्थेच्या शाळा आहेत. शिस्तीसाठी ही शाळा ठाण्यामध्ये ओळखली जाते. शाळेमध्ये सांस्कृतिक वातावरणासोबत विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे द्यावेत या उद्देशातून व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार व्हावेत यासाठी रामरक्षा, भगवद्गीता यांचे पठण केले जाते. माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेबद्दल ओढ वाटण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.
१२ तासांची पंचकोशाधारित गुरुकुल, अंबरनाथ
स्थापना– २००१
संस्थापक संस्था– द एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम आहे.
वैशिष्टय़े– १२ तासांची शाळा अशी ओळख या उपक्रमाची असून पंचकोशाधारित गुरुकुल शाळेच्या या ओळखीमुळेच वांगणीपासून डोंबिवलीपर्यंत आणि कल्याणपासून बदलापूपर्यंत सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. सूर्यनमस्कार, योगापासून ते छंद वर्गापर्यंत अनेक उपक्रम या शाळेत राबवले जातात. छंद वर्गामध्ये पेटी, तबला, गायन, समूह गायन, सहअभिनय पाठांतर, गटचर्चा, समाचार समीक्षा आणि रोज संध्याकाळी दीड तासांचे मैदानी खेळ हे या शाळेचे वेगळेपण आहे. खेळामध्ये भारतीय खेळांना प्रथम प्राधान्य देऊन कबड्डी, खोखो अशा खेळांना संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असून अ‍ॅथलेटिक्ससाठी विशेष भर दिला जात आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी डबा आणला नाही, तर त्याच्या जेवणाची सोयही शाळेमध्ये केली जाते. भारतीय परंपरांचे जतन करून पारंपरिक शिक्षण प्रणालीची माहिती देण्याकडे संस्थेचा कल आहे. वर्षभरात सुमारे ७५ वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जात असून पालकांसाठीही विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. करिअर मार्गदर्शन, विद्याव्रत सोहळा, मातृपरिचय शिबीर, क्षेत्रभेटी अशा विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचे वर्षभर शिक्षण आणि उपक्रमांनी भरलेले वेळापत्रक असते. व्यवस्थापक म्हणून धनंजय खटावकर सध्या कार्यरत आहेत.

सरस्वती विद्यामंदिर
स्थापना– सरस्वती विद्यामंदिर संस्थेची स्थापना ६ जून १९५२. १९६६ मध्ये शाळेचा श्रीगणेशा.
संस्थापक– विमलाताई कर्वे, चि. श्री कर्वे, ग. ना. गाजरे.
वैशिष्टय़े– सरस्वती विद्यामंदिराची शैक्षणिक प्रगती महत्त्वपूर्ण असून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संशोधकांमध्येही या शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते संशोधक डॉ. अमोल दिघे याच महाविद्यालयातून घडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:19 am

Web Title: education 3
टॅग : Thane
Next Stories
1 महागायिकांचे महागुरू
2 रेल्वेच्या मार्गातील दिव्याचा ‘गतिरोधक’ हटणार!
3 ६८६ इमारती धोकादायक
Just Now!
X