24 September 2020

News Flash

प्रचार साहित्याचा ऑनलाइन बाजार तेजीत

निवडणुकीच्या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात प्रचार साहित्याची विक्री होत असते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

 

झेंडे, टोप्यांना मोठय़ा सवलती; भाजपच्या साहित्याची चलती

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून इतर अन्य वस्तूंप्रमाणे प्रचार साहित्याचीही ऑनलाइन विक्री केली जात आहे.

निवडणुकीच्या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात प्रचार साहित्याची विक्री होत असते. या वर्षी मात्र, नोटबंदीच्या कळा सोसाव्या लागल्याने अनेक दुकानात तुलनेने फार कमी साहित्य उपलब्ध झाले. याचाच फायदा घेत वस्तू खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाइन संकेतस्थळावर सेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासारख्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे प्रचार साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यात झेंडे, टोप्या, जॅकेट, पटके, पक्षांच्या रंगाचे कपडे इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे संकेस्थळावर भाजपचे प्रचार साहित्य सर्वाधिक विक्रीसाठी असून त्यांनी तब्बल ३० ते ४० टक्क्यांची घसघशीत सूट दिली आहे. त्यामुळे

निवडणुकींचा निकाल लागलेला नसला तरी, प्रचार साहित्यांच्या ‘ऑनलाइन’ कारभारात भाजपने मात्र आघाडीघेतल्याचे दिसून येत आहे. या संकेतस्थळावर शिवसेनेचा भगवा झेंडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले मोबाइल कव्हर, लहान-मोठय़ा आकाराचे राजकीय झेंडे, डॅशबोर्ड झेंडे, पक्ष चिन्हे इत्यादी वस्तू मोफत घरपोच सेवेसह उपलब्ध आहेत. त्यातील अनेक वस्तू ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाल्या आहेत. एकाच संकेतस्थळावर प्रचार साहित्य मिळत असल्याने अनेकांचा कल या वस्तूंकडे वाढताना दिसू शकतो.

प्रचार साहित्यांचे दर

  • ५ झेंडे २५० ते ३०० रुपये
  • पक्ष चिन्हे १०० ते १२०
  • टोप्या १०० ते २००
  • पटके १०० ते १२०

उल्हासनगरमध्ये मात्र बाजार थंडच

महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असली तरी त्याचा प्रचार साहित्य खरेदीवर अद्याप काहीही परिणाम झालेला दिसत नसून त्यामुळे प्रचार साहित्य विक्रेते आणि निर्माते हवालदिल झाले आहेत. पॅनल पद्धतीमुळे प्रचार साहित्याचा खर्च करणार कोण, यावर साहित्य खरेदीचे घोडे अडल्याचे कळते आहे.

उल्हासनगर महापालिकेसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगातर्फे अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता इतर उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारपासून खऱ्या प्रचाराला सुरुवात झाली. येत्या १९ फेब्रुवारी रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या खऱ्या प्रचारासाठी अवघे अकरा दिवस मिळणार असल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे. त्यातच प्रभाग पद्धतीने मतदारक्षेत्र प्रचंड वाढले आहे.

चार वार्डचा एक प्रभाग असा एकूण पसारा वाढल्याने सामूहिकपणे प्रचार करावा लागणार असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र त्याचवेळी प्रचार साहित्य कोण घेणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रचार साहित्य विक्रेते हवालदिल झाले आहेत. प्रचाराची सुरुवात झाली असली तरी अद्याप दोन ते तीन ग्राहकांशिवाय एकही उमेदवार प्रचार साहित्य विक्रेत्यांकडे फिरकले नाहीत.

त्यात अपक्षांची मागणीही कमी झाल्याने यंदाचा व्यवसाय रोडावतो की काय अशी भीती विक्रेत्यांना वाटते.

उल्हासनगर शहरात आठ ते दहा मोठे प्रचार साहित्य विक्रेते आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातून प्रचार साहित्याची मागणी असते.

तसेच स्वस्त वस्तूंसाठी उल्हासनगर शहर ओळखले जात असल्याने शेजारच्या जिल्ह्य़ांमधूनही येथे प्रचार साहित्य खरेदीसाठी पक्ष आणि उमेदवार येत असतात. मात्र यंदा संपूर्ण बाजारात शुकशुकाट असून उमेदवारांच्या अभावी विक्रेते हवालदिल झाले आहेत.

प्रतिसाद शून्य

पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले, टी शर्ट, साडय़ा या जुन्या प्रचार साहित्यासोबत आता नव्याने ब्रेसलेट, अंगठी, हातातील पट्टी, कमरेचा छल्ला, केसांची क्लिप असे साहित्य बाजारात आले आहे. मात्र त्यालाही प्रतिसाद नसल्याचे चित्र बाजारात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:21 am

Web Title: election promotion material online market
Next Stories
1 वीजचोरांवर कारवाईचा अंकुश
2 तरुणाईला ‘जम्बो भेटकार्ड’, ‘आयफेल टॉवर’ची भुरळ
3 ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा शेवटचा आठवडा!
Just Now!
X