News Flash

नौपाडा भागात विजेचा खेळखंडोबा

विद्युत वाहिनीत सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या तीन दिवसांपासून नौपाडा भागातील विद्युतपुरवठा दोन ते तीन तासांसाठी खंडित होऊ लागला आहे.

तीन दिवसांपासून दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित

ठाणे : विद्युत वाहिनीत सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या तीन दिवसांपासून नौपाडा भागातील विद्युतपुरवठा दोन ते तीन तासांसाठी खंडित होऊ लागला आहे. रहिवासी क्षेत्रासह नौपाडा भागात मोठय़ा प्रमाणात दुकाने, सरकारी कार्यालयेही आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले. तसेच घरून काम करणाऱ्यांची कामे रखडत आहेत. र्निबधांमुळे आधीच हैराण असलेल्या दुकानदारांनाही याचा फटका बसत आहे.

नौपाडा भाग ठाणे स्थानक परिसराच्या जवळ असल्याने अनेक सरकारी, खासगी कंपन्यांची कार्यालये, वस्तू विक्रीची दुकाने या भागात आहेत. काही मिनिटांसाठी येथील वीजपुरवठा खंडित झाल्यास या भागातील कारभार ठप्प होतो. गेल्या तीन दिवसांपासून नौपाडा भागातील वीजपुरवठा विद्युत वाहिनीच्या बिघाडामुळे सुमारे दोन ते तीन तासांसाठी खंडित होत आहे. राज्यात करोनाच्या र्निबधांमुळे दुकानदारांना सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा आहे. विजेच्या लपंडावामुळे दुकानदारांच्या व्यापारावर परिणाम होतो. खासगी कंपन्यांची कार्यालयेही नौपाडा क्षेत्रात आहेत. त्यामुळे या कंपन्यांत काम करणाऱ्या कामगारांचीही कामेही ठप्प झाली होती. या संदर्भात महावितरण कंपनीकडे विचारणा केली असता विद्युत तारांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तो दुरुस्त करण्यात आला असून विद्युत पुरवठा सुरू झाल्याचे सांगितले.

महापालिकेचे कामकाज ठप्प

नौपाडा येथील गावदेवी परिसरात ठाणे महापालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे. येथे नागरिक विविध दाखले तसेच सरकारी कागदपत्रे मिळविण्यासाठी येत असतात. शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत येथील विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना दाखल्यासाठी तीन तास रांगेत वाट पाहावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:04 am

Web Title: electric playground in naupada area thane ssh 93
Next Stories
1 जिल्ह्य़ात निकाल ९९.२८ टक्के
2 नेवाळी चौकात पुलाचाच पर्याय
3 ठाकुर्लीतील ‘त्या’ इमारती पाडण्याचे न्यायालयाचे आदेश
Just Now!
X