डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील ३७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाकडून आपला गेल्या चार वर्षांपासून छळ होत आहे, अशी तक्रार मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. विद्यापीठ प्रशासन, शिक्षणमंत्री यांना वारंवार निवेदने देऊनही आपल्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या गंभीर प्रकरणात लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा ५ फेब्रुवारी रोजी फोर्टमधील विद्यापीठ संकुलासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे निवेदन पेंढरकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुलगुरू राजन वेळुकर यांना दिले आहे.
उपोषण केले म्हणून पेंढरकर महाविद्यालय व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर त्याची जबाबदारी कुलगुरू यांच्यावर राहील, असेही कर्मचाऱ्यांनी सूचित केले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. वसंत शेकडे हेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय संस्थेचे प्रभाकर देसाई अध्यक्ष झाल्यापासून कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मानसिक छळवणुकीची माहिती कर्मचाऱ्यांनी निवेदनात सविस्तरपणे दिली आहे. या छळाला महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य हातभार लावत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
नाताळ, दिवाळी, मे महिन्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञांना मिळणाऱ्या हक्काच्या सुट्टय़ा रद्द करणे, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन ती पुन्हा काढून घेणे, आकसाने कारणे दाखवा नोटिसा देऊन कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे, वेतन आयोग लागू करण्यास टाळटाळ करणे, प्रवास, महागाई भत्ता बंद करणे, दुसरा, चौथा शनिवार सुट्टी बंद करणे अशा प्रकारे छळ सुरू असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या विषयीच्या तक्रारी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांच्यातर्फे शासन, विद्यापीठाकडे करण्यात आल्या आहेत, पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नस्ती अडकून ठेवणे, अपंग कर्मचाऱ्यांना त्रास देणे असेही प्रकार सुरू असल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्यपालांनी पेंढरकर महाविद्यालयात कर्मचाऱ्यांवर सुरू असलेल्या अन्याय प्रकरणाची विद्यापीठाला दखल घेण्याचे आदेश दिले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही अनेक निवेदने देण्यात आली आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राचार्याशी कार्यालयात सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तेथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. डॉ. वसंत शेकडे यांच्याशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते.