नोकरदारांच्या मासिक जमाखर्चाचे गणित विस्कळीत

ठाणे : लोकल सेवा बंद असल्याने रस्त्यांवर वाढलेला वाहतुकीचा भार आणि त्यामुळे जागोजागी होणारी कोंडी यांमुळे सर्वसामान्य नोकरदारांच्या प्रवासाचा वेळ वाढला आहेच; पण या वेळखाऊ प्रवासासाठी त्यांच्या खिशालाही मोठी कात्री लागत आहे. खासगी वाहने अथवा अ‍ॅपआधारित टॅक्सीमधून दररोज मुंबईत कामासाठी ये-जा करणाऱ्यांना सरासरी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत.

राज्य सरकारने एकूण कर्मचारी संख्येच्या दहा टक्के इतक्याच प्रमाणात कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी असे बंधन घातले असले तरी प्रत्यक्षात मात्र या प्रक्रियेवर फारसे कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे अनेक खासगी कार्यालयांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक संख्येने कर्मचाऱ्यांना बोलाविले जात आहे. ठाणेपलीकडे असलेल्या शहरांमधून मुंबईच्या दिशेने दररोज मोठय़ा संख्येने खासगी वाहनांनी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. एरवी या प्रवाशांना उपनगरीय लोकलने अवघ्या तासभरात मुंबई गाठता येत असे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकल वाहतूक बंद असल्याने हे चाकरमानी बस आणि खासगी वाहनांनी मुंबईतील कार्यालये गाठत आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला आहे.

घोडबंदर मार्गावरून जाणाऱ्या राज्य परिवहन आणि इतर महापालिकांच्या बसची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे सध्या खासगी रिक्षा किंवा टॅक्सीने मुंबईत जावे लागत असल्याचे कासारवडवली येथे राहणाऱ्या सिद्धेश शर्मा याने सांगितले. या वाहतुकीसाठी दररोज २०० ते २५० रुपये खर्च येतो. घरातील तीन जण कामाला असल्यामुळे केवळ वाहतूक खर्चापायी महिन्याला १७ हजारांहून अधिक खर्च येत असून एरवीच्या तुलनेत हा खर्च तिपटीने वाढला आहे.

सामान्यांतून संतापाचा सूर

लोकल सुरू करून आमचा प्रवास किमान खिशाला परवडेल असा करावा, अशी मागणी बदलापूर येथे राहणाऱ्या प्रशांत दिवटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. खासगी वाहने, बसेसमधून प्रवास करतानाही अनेक ठिकाणी अंतरसोवळ्याचे नियम पाळले जात नाहीत. असे असताना लोकल बंद करून सरकार फार काही साध्य करत आहे असे नाही, अशी प्रतिक्रिया कल्याणमधील छाया गवळी यांनी दिली. या प्रवासादरम्यान रस्त्यात कोठेही  स्वच्छतागृह नसल्याने महिला प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून दररोजचा हा रस्ते प्रवास आता नकोसा झाल्याचेही छाया यांनी सांगितले.