अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; नागरिकांच्या हालात भर

सावरकरनगर येथील ठाणे परिवहन उपक्रमाच्या बस थांब्यावर रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले आहे. वाहनचालकांना चौकातच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. बस थांब्यावरच रिक्षा चालकांनी रिक्षा उभ्या करून ठाणे परिवहन सेवेचा बस थांबा अडविण्यात आला आहे. स्थानक परिसराकडे येणाऱ्या मार्गावर चौकातच असलेल्या या बस थांब्याजवळ रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यासंदर्भात परिवहन मंडळाकडून याची दखलही घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर असलेल्या सावरकरनगर आणि यशोधननगर या परिसरातील नागरिक कामगार चौकातून ठाणे रेल्वेस्थानकाकडे प्रवास करीत असतात. लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी सावरकरनगर बस थांबा आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी रेल्वे स्थानकाकडे मार्गक्रमण करणारे नागरिक या चौकातून प्रवास करतात. ठाणे परिवहन सेवेच्या बस स्थानक परिसराकडे जाताना सावरकरनगर बस थांब्याजवळ बस थांबतात; मात्र या बस थांब्याजवळच शेअर रिक्षा चालकांनी अतिक्रमण केले असल्यामुळे उभ्या असलेल्या रिक्षांच्या समोर बस थांबतात. भाडे आकारण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागापर्यंत येऊन रिक्षा चालक प्रवाशांना अडवत असल्याने सकाळी कार्यालयीन वेळेत हा परिसर गोंगाटाने गजबजलेला असतो.

उशिराचा फायदा

ठाणे परिवहन सेवेच्या अनियमित वेळ यामुळे त्रस्त नागरिकदेखील या शेअर रिक्षाचा पर्याय निवडतात. सकाळी रिक्षासाठी या चौकात नागरिकांची रांग, वाहनांची गर्दी, भाडे आकारण्यासाठी रिक्षाचालकांचा आवाज या गोंधळामुळे येथून प्रवास करणे नागरिकांसाठी कंटाळवाणे ठरत आहे.

सावरकरनगर येथील नागरिकांसाठी बस थांबा अडवलेला हा शेअर रिक्षा थांबा सोईस्कर असला तरी या परिसरातून प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांना या रिक्षाच्या रांगेमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याचे किरण पवार यांनी सांगितले.

रिक्षा थांबा नका हटवू

ठाणे परिवहन बस थांब्यावर रिक्षा चालकांनी अतिक्रमण केले असल्याने एकीकडे वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. मात्र या अनधिकृत रिक्षा थांब्याचा उपयोग करणारे नागरिक मात्र सावरकरनगर परिसरात शेअर रिक्षासाठी अन्य रिक्षा थांबा नसल्याने हा अनधिकृत रिक्षा थांबा हटवण्यास नकार देत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. सावरकरनगर चौकातून स्थानक परिसरात जायचे असल्यास अन्य रिक्षा चालक रिक्षा या चौकातच थांबवत नसल्याने शेअर रिक्षाशिवाय नागरिकांना पर्याय नाही. बस थांब्याजवळ असलेला हा रिक्षा थांबा हटवल्यास सावरकरनगरमधील नागरिकांची रिक्षासाठी परवड होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.