महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होताच ठाणे रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करणारे संजीव जयस्वाल यांच्या नाकावर टिच्चून ठाणे पूर्व भागातील रस्ते, पदपथ आणि मोकळय़ा जागा फेरीवाल्यांनी बळकावण्यास सुरुवात केली आहे. जागोजागी पानटपऱ्या, पदपथावरील फेरीवाल्यांचा बाजार, भिकारी-गर्दुल्ल्यांचा उपद्रव आणि रात्रीच्या वेळी ठाणे रेल्वेस्थानकाच्या आवारातच पथारी पसरून आडवे होणारे रहिवासी यामुळे ठाणे पूर्व परिसराला अवकळा आणली आहे.  
ठाणे रेल्वे स्थानकातील वर्दळीचे प्रमाण लक्षात घेऊन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आयुक्तपदी येताच या परिसराचा दौरा करून फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर काही दिवस ठाणे स्थानक परिसरातील कोंडी काहीशी सुटली होती. मात्र आयुक्तांची पाठ फिरताच येथे पुन्हा अतिक्रमणे सुरू झाली आहेत. ठाणे पूर्वेकडील भागात तर फेरीवाल्यांनी रस्त्यावर बाजार सुरू केला आहे. खाद्यपदार्थाची विक्री करणारे स्टॉल्स, पदपथावरच जागा अडवून उभारलेल्या टपऱ्या, त्याशेजारी विक्रीसाठी वस्तू मांडण्यासाठी बसलेले विक्रेते या सर्वामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. हे सर्व सुरू असताना पालिकेचे अधिकारी मात्र, मूग गिळून बसले असल्याने या अतिक्रमणांना राजकीय आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
कोपरी परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात चाळी आणि झोपडपट्टी असल्याने या भागातील घरे अत्यंत छोटी आहेत. एकाच कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असल्याने रात्रीच्या वेळी घरातील जादा माणसे स्थानक परिसरातील मोकळ्या जागेवर येऊन बिनदिक्कत झोपत असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना होऊ लागला आहे. ठाणे पूर्वेतील सॅटिस स्कायवॉकवर भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा मोठा वावर असून त्यांचा त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागतो. दिवसाढवळय़ाही या लोकांचा उपद्रव होत असल्याने सॅटिसच्या स्कायवॉकचा वापर करण्यासही महिला प्रवासी धजावत नाहीत.

खासगी बसगाडय़ांचा अनधिकृत अड्डा
ठाणे पूर्वेतून ठाणे शहरातील पश्चिमेकडील भागामध्ये वाहतूक करणारी खासगी वाहने या भागातून सुटत असून, अशा खासगी वाहतुकीचा अनधिकृत अड्डा या भागात निर्माण झाला आहे. स्थानकाबाहेरील रस्त्यावर अशा वाहनांच्या मोठ-मोठय़ा रांगा लागल्या असून, त्यामधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्याही मोठय़ा रांगा या भागात लागत असल्याने सायंकाळच्या वेळी या भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो.
जयेश सामंत/श्रीकांत सावंत, ठाणे