वसई-विरार महापालिकेच्या विकासकामांना खीळ

विरार :  वसई – विरार शहरात झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा फटका पालिकेच्या आरक्षित भूखंडांना बसला आहे. पालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे विविध विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे पालिकेची अनेक विकासकामे रखडली आहेत.

शहरातील विविध सरकारी जागा, वनजमिनी भूमाफियांनी गिळंकृत केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता पालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी नागरी सोयीसुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अतिक्रमणे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वसई विभागामध्ये ५६.६९ टक्के, नालासोपारा विभागामध्ये ७७.३७ टक्के तर विरार विभागामध्ये ३८.४५ टक्के राखीव भूंखडावर अनधिकृतपणे  अतिक्रमण झालेले आहे.  हे आरक्षित भूंखड शाळा, खेळण्याची मैदाने, उद्याने, पोलीस ठाणे, कचराभूमी, शाळा, पार्किंग,बास थांबे, मार्केट आणि इतर  सोयी सुविधांसाठी पालिकेकडून राखीव ठेवण्यात आली आहेत. पण मागील काही वर्षांत पालिकेने या भूखंडावर कोणतेही लक्ष न दिल्याने या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.  रहिवाशी वस्त्या, इमारती, बाजारपेठा उभ्या केल्या आहेत.

वसई-विरार परिसरात ७५८  भूखंड  हे विविध आरक्षणाच्या नावाखाली आरक्षित करण्यात आले आहेत.  यातील १३८ भूखंड हे मैदानासाठी आरक्षित आहेत त्यातील १३४   भूखंडांवर  अतिक्रमण झाले आहेत. यावरून इतर आरक्षित भूखंडाची काय स्थिती आहे  हे लक्षात येते. पालिकेने मागील १० वर्षात केवळ ७१ भूखंडावरील अतिक्रमण हटवून ताब्यात घेतले आहेत.

विशेष बाब म्हणजे कोणत्या प्रभागात किती? आणि कोणते आरक्षित भूखंड आहेत, याची कोणतीही माहिती महानगर पालिकेकडे नाही. ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. परंतु करोना महामारीमुळे या कामाला खिळ बसली आहे.  आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणाचा सर्वात मोठा फटका  रिंग रूट प्रकल्पाला बसला आहे. आजतयागत हा प्रकल्प आरक्षित मार्गातील अतिक्रमणामुळे रखडला आहे.

भूखंड कुठे, त्याची स्थिती काय?; पालिका अनभिज्ञ

पालिकेच्या नगर रचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार  आचोळे – ६९, आगाशी- १०, बापाने, ०१, ब्रह्मपूर – ११, भुईगाव- ०३, गास – १०, दिवाणमान – २६, धोवली- १७, बोळिंज – ५४, चंदनसार – ११, चुळणे – १०, दहिसर- ०९, मालांडे- २३, माणिकपूर – २२, मोरे – १३, मुळगाव- ०६, नाळे – १, नारंगी झ्र ४५, गासकोपरी – ०५, गिरिज- ०३, गोखीवरे- ३३, जुचंद्र – ३५, करमाळे- ०३, कसराळी- १०, कोफरड – १०, नवघर – ११, निलेमोरे- ४१, निर्मल- २, पेल्हार- ०३, राजावली- ३६, समेळ – ०४, सांडोर- १८, सातिवली- ०६, शिरगाव- १४, सोपारे- १९, तुळिंज- १६, उमेल, २६, उमेळमान- ०७, वाघोली- ०२, वाटार- ०१, विरार- ८०, वालीव- २९  इत्यादी  परिसरात वेगवेगळ्या नावाखाली भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.  पण या जागा नेमक्या कुठे आणि त्याची स्थिती काय याची कोणतीही माहिती पालिकेकडे नाही.

 

या संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. प्रभागनिहाय पाहणी केली जात असून त्याचे अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे, अहवाल पूर्ण झाल्यावर त्यावर योग्य कारवाई करून आरक्षित भूखंड ताब्यात घेतले जातील. – प्रदीप जांभळे-पाटील , उपायुक्त वसई-विरार शहर महानगरपालिका