लोकमान्यनगरमधील जागेच्या निश्चितीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे

ठाणे : शहरातील बहुचर्चित समूह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविताना तेथील नागरिकांच्या तात्पुरत्या निवासासाठी लागणारी संक्रमण शिबिरे उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी लोकमान्यनगर भागातील एक जागा निश्चित केली असून त्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. याशिवाय शहरात इतर ठिकाणी अशाप्रकारची संक्रमण शिबिरे उभारण्यासाठी पालिकेने जागांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पहिल्या टप्प्यात किसननगर आणि लोकमान्यनगर भागात क्लस्टर योजनेचे काम सुरू होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

ठाणे शहरातील बेकायदा इमारती, चाळी आणि झोपडपट्टय़ांचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेकडून क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शहरातील विविध भागांचे एकूण ४४ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र १५०९ हेक्टर इतके आहे. ४४ पैकी १२ आराखडय़ांना यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये लोकमान्यनगर, कोपरी, किसननगर, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, आझादनगर, गोकुळनगर, महागिरी, चरई, सिद्धेश्वर परिसर आणि स्थानक परिसर या भागातील आराखडय़ांचा समावेश होता. या सर्वच भागात महापालिकेकडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर किसननगर आणि हाजुरी भागात समूह पुनर्विकास योजनेचे उद्घाटन कार्यक्रम दोन वर्षांपूवी पार पडला.

करोना काळामुळे योजनेचे काम थंडावल्याचे चित्र होते. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग कमी होऊ लागताच महापालिका प्रशासनाने क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात किसननगर भागामध्येच क्लस्टर योजनेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. ही योजना राबविताना नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठीच महापालिकेने लोकमान्यनगर येथील दोस्ती विहार भागातील अंदाजे १६०० चौरस मीटरच्या भूखंडावर संक्रमण शिबीर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संक्रमण शिबिराचा फायदा लोकमान्यनगर भागात क्लस्टर योजना राबविताना होणार आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी अशा प्रकारची संक्रमण शिबिरे उभारण्यासाठी पालिकेकडून जागांचा शोध सुरू असून त्याचबरोबर इतर योजनेतून नागरिकांच्या निवासासाठी घरे उपलब्ध होऊ शकतात का, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

करोना काळामुळे क्लस्टर योजनेच्या काम संथगतीने सुरू होते. परंतु या योजनेच्या कामाला आता गती देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेसाठी संक्रमण शिबिरे उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पहिल्या टप्प्यात किसननगर आणि लोकमान्यनगर भागांत क्लस्टर योजनेचे काम मार्गी लागेल.

-डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका