News Flash

व्यापारीवर्गाचीही घुसमट!

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांनी टाळेबंदीला विरोध केला आहे.

ठाणे / बदलापूर : तीन महिन्यांच्या देशव्यापी टाळेबंदीनंतर खुल्या झालेल्या बाजारपेठा आता स्थानिक स्तरांवरील निर्बंधांमुळे बंद कराव्या लागत असल्याने व्यापारी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.   टाळेबंदीमुळे आर्थिक  कोंडी होऊ लागल्याने उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागातील व्यापाऱ्यांनी टाळेबंदीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर  ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मालाची नासाडी होऊ नये म्हणून किराणा बाजारपेठ सुरु करण्याची मागणी केली आहे.

जून महिन्यात टाळेबंदी शिथिलीकरणानंतर जिल्ह्य़ातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकानामध्ये धान्य, किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तु असा साठा भरून ठेवला. मात्र, त्याची विक्री होण्याआधीच जिल्ह्य़ात पुन्हा टाळेबंदी लागू झाली. काही महापालिका क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक वस्तु, किराणा मालाच्या विक्रीसाठी दुकानदारांना वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रात मात्र ही दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. इतके दिवस किराणा दुकाने बंद राहिली तर धान्य, कडधान्य, किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तुना बुरशी तसेच किड लागुन मालाची नासाडी होते, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. ठाणे घाऊक बाजारात प्रत्येक व्यापाऱ्याकडे २५ ते ३० लाख रूपयांचा मालाचा साठा असल्याने त्यांना टाळेबंदीमुळे नाहक नुकसान सोसावे लागत असल्याचे ठाणे व्यापारी मंडळाकडून सांगण्यात आले. तसेच ठाणे व्यापारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र पाठवून दुकाने ४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांनी टाळेबंदीला विरोध केला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्याने जाहीर केली जाणारी टाळेबंदी वाढवून व्यापाऱ्यांना देशोधडीला लावू नका. टाळेबंदीला दिलेली मुदतवाढ रद्द करण्याची मागणी येथील व्यापारी करत आहेत. टाळेबंदी मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा बदलापूरातील व्यापाऱ्यांनी दिला आहे. उल्हासनगर शहरात टाळेबंदीची मुदत २२ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून याबाबत उल्हासनगर ट्रेड असोसिएशननेही आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना पत्र पाठवून टाळेबंदी रद्द करण्याची मागणी केली आहे.

‘टाळेबंदीतही रूग्णसंख्या कमी होण्याऐवजी रूग्ण वाढलेच आहेत. त्यामुळे आमची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या. टाळेबंदीत दुकाने बंद असूनही दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांना वेतन दिले. मात्र आता आमच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाचा प्रश्न समोर उभा राहिला आहे.

– राजेश जाधव, अध्यक्ष, बदलापूर बाजारपेठ व्यापारी संघटना

 जुलै महिन्याच्या सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर आम्हीच टाळेबंदीची मागणी केली होती. मात्र आता त्याचा गैरफायदा घेऊन टाळेबंदी वाढवली असून यामुळे आमच्यावरचे आर्थिक संकट आणखीच गडद होत आहे.

– दीपक छतलानी, सचिव उल्हासनगर ट्रेड असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:47 am

Web Title: extreme unrest in business class due to lockdown in thane zws 70
Next Stories
1 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या हाती अभ्यासाच्या प्रती
2 ठाणे पालिकेची शून्य कोविड मोहीम
3 प्रदूषण नियंत्रण मंडळाची ‘कडोंमपा’ला नोटीस
Just Now!
X