पाण्यासाठी नागरिकांना महिन्याला सात ते आठ हजार रुपये खर्च

किशोर कोकणे, लोकसत्ता

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

ठाणे : ठाणे शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दिवा शहरात पुन्हा भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने दररोज ४० लिटर पिण्याच्या पाण्यासाठी १५० रुपये मोजावे लागत आहे. टँकरद्वारे १२५ रुपयांना इतर वापरासाठी पाणी खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे दर महिन्याला येथील नागरिकांना सात ते आठ हजार रुपये फक्त पाण्यावर खर्च करावा लागत आहे. करोनाकाळात नोकऱ्या गमावून बसलेल्या अनेकांना तर आपली बँकेतील बचतही पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे.

ठाणे, मुंबईच्या तुलनेत अगदी निम्म्या किमतीत घरे मिळत असल्याने दिवा शहरात मोठय़ा प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. या भागातील बहुतांश नागरिक रोजंदारी किंवा मुंबई, ठाण्यातील छोटय़ा कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. २०२० मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर येथील बहुतांश नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यात यावर्षी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील चाळी आणि इमारतींच्या आवारात आता पाण्याचे टँकर फिरू लागले आहेत. या टँकरला प्रत्येक २५० लिटर पाण्यामागे एका कुटुंबाला १२५ रुपये मोजावे लागतात. हे पाणी एका दिवसात संपते. प्रत्येक कुटुंबाला दिवसाला ३० ते ४० लिटर पिण्याचे पाणी खरेदी करावे लागत आहेत. त्याचेही वेगळे १२० ते १५० रुपये मोजावे लागतात. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी चाळीतील नागरिकांसाठी मोफत टँकर सेवा उपलब्ध करून दिली आहे. या मोफत पाण्यासाठीही नागरिकांची झुंबड उडत असते. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारकडून महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जाते. मात्र दिव्यातील अनेक भागात नागरिकांच्या टँकरसमोर रांगा लागल्याचे चित्र आहे. जर पाण्यासाठी रांगा नाही लावल्या तर पाणीटंचाईमुळे जीव जाण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे येथील नागरिकांनी सांगितले.

दिवा येथील आगासन रोड भागात राहणाऱ्या उषा साळुंखे यांचे प्लास्टिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. मागील वर्षी करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे त्यांच्या पतीची नोकरी गेली. त्यामुळे सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निर्बंधांमुळे त्यांचेही दुकान बंद आहे. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज १०० ते १२० रुपये तर वापराच्या पाण्यासाठी १२५ रुपये खर्च करावे लागत आहेत. व्यवसाय बंद असल्याने सध्या आईच्या निवृत्ती वेतनामध्ये शिल्लक असलेल्या बचतीतील पैसे पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. सुमारे सात ते आठ हजार पाण्यावरच खर्च होतो, असे त्यांनी सांगितले.

मुंब्रादेवी कॉलनी भागात राहणाऱ्या अश्विनी मोहिते यांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांची आणि त्यांच्या पतीची नोकरी गेली आहे. बँकेमध्ये असलेली बचत वापरून ते सध्या घर चालवित आहे. त्यात आता पाण्याचा नवा खर्च त्यांच्या अंगावर येऊन पडला आहे. पाणी काटकसरीने वापरण्यासाठी त्यांनी एकावेळी एक ग्लास पाण्याऐवजी अर्धा ग्लास पाणी पिण्यास सुरुवात केली आहे. पिण्याचे पाणी महाग असल्याने वापराचे पाणी ते गाळून आणि उकळून पित आहेत. तर कपडे धुण्यासाठी परिसरातील विहिरीवर जावे लागत आहे. दोन तास याठिकाणी रांग लावल्यावर त्यांना कपडे धुण्यासाठी विहिरीवर जागा मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

शहरातील चाळी तसेच इतर इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचीही अशीच अवस्था आहे. अनेक इमारतींमध्ये एकत्र टँकर आणला जातो. टँकरसमोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे करोना काळातही जीव मुठीत घेऊन पाणी भरावे लागत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून टाळेबंदीमुळे बंद आहे. त्यात मुलांचे शैक्षणिक शुल्क, घरखर्च यामुळे मोठय़ा प्रमाणात खर्च वाढला आहे. त्यात पाण्याचा खर्च यामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.

– दिव्या भेंडे, समर्थनगर, दिवा.