बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी निर्णय
फोफावत चाललेला बोगस वैद्यकीय व्यवसाय आणि चुकीच्या उपचार पद्धतींमुळे रुग्णांना होणारा धोका या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील सर्व डॉक्टरांची सक्तीने नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रुग्णांना औषधांसाठी दिल्या जाणाऱ्या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांना आता त्यांच्या नावासह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा नोंदणी क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रतेनुसार डॉक्टरांची वर्गवारी करण्यात आली असून त्याआधारे डॉक्टरांना वर्षांकाठी पंधरा हजारांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाणार आहे. तीन वर्षांकरिता ही नोंदणी केली जाणार आहे. मात्र या मुदतीनंतर पुनर्नोदणी करणार नाहीत, अशा व्यावसायिकांना प्रति दिन ५० रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांतील विविध भागांत बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे येऊ लागल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू करण्यात येते. बोगस डॉक्टर दवाखाने बंद करून पसार होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास येते. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी करण्यात येत नसल्यामुळे त्यांची पुरेशी माहिती महापालिकेकडे नाही. परिणामी, शहरातील दवाखान्यांमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता आहे की नाही, याची खातरजमा करणे शक्य होत नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या परिचारिका, एक्सरे तंत्रज्ञ, औषध निर्माता, ईसीजी तंत्रज्ञ यांची शैक्षणिक पात्रतादेखील तपासली जाणार आहे.
डॉक्टरांसाठी वार्षिक शुल्काचे दर
‘अ’ वर्गासाठी १५ हजार, ‘ब’ वर्गासाठी १० हजार, ‘क’ वर्गासाठी पाच हजार, ‘ड’ वर्गासाठी तीन हजार, ‘ई’ वर्गासाठी दोन हजार, ‘एफ’ वर्गासाठी पंधराशे रुपये आणि ‘जी’ वर्गासाठी एक हजार रुपये असे शुल्क डॉक्टरांकडून वर्षांकाठी आकारले जाणार आहे.
डॉक्टरांची वर्गवारी..
- एमबीबीएस व एमएस/ एमडी/ एमसीएच या शैक्षणिक पात्रतेचे डॉक्टर ‘अ’ वर्गात
- एमबीबीएस व पदविकाधारक डॉक्टर ‘ब’ वर्गात
- एमबीबीएस डॉक्टर ‘क’ वर्गात
- बीएएमएस/ पदव्युत्तर पदवी/ पदविका झालेले डॉक्टर ‘ड’ वर्गात
- बीएचएमएस/ डीएचएमएस/ युनानी/ होमिओपॅथिक डॉक्टर ‘ई’ वर्गात
- पॅथॉलॉजी प्रयोगशाळा/ एक्सरे मशीन वैद्यकीय व्यावसायिक ‘एफ’ वर्गात
- इलेक्ट्रोपथीचे व्यावसायिक ‘जी’ वर्गात
नोंदणी क्रमांक बंधनकारक..
अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानी अशा चार पॅथींच्या वैद्यकीय तज्ज्ञांना राज्यात व्यवसाय करण्याची परवानगी आहे. या व्यावसायिकांकडून रुग्णांना औषधे खरेदी करण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जाते आणि त्याआधारे औषध दुकानांतून रुग्णांना औषधे दिली जातात. या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांना आता त्यांचे नाव, स्वाक्षरी आणि संबंधित पॅथीचा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी क्रमांक नमूद करणे सक्तीचे करण्यात येणार आहे.