ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने संकेतस्थळ

ठाणे :  टाळेबंदीच्या काळातही दैनंदिन भाजीपाला घेण्यासाठी नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ही गर्दी टाळता यावी तसेच यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. ठाण्यातील मी मराठी प्रतिष्ठान आणि क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि. यांच्या माध्यमातून ठाणेकरांना थेट शेतातील भाजीपाला वाजवी दरात त्यांच्या इमारतीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल, असा निर्णय महापौर नरेश म्हस्के यांनी मंगळवारी उशिरा झालेल्या बैठकीत घेतला.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे करोना विषाणू संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही गर्दी टाळण्यासाठी ठाणे शहरात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकार्याने शेतातील भाजीपाला वाजवी दरात थेट इमरतीपर्यंत पोहोचवण्यासाठी संकेतस्थळ आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून ठाणेकरांना हव्या असलेल्या भाज्या आणि फळे त्यांच्या घरपोच उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक खरेदीमागे १० रुपयांचा निधी हा करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिला जाणार आहे. त्यामुळे या उपक्रमातून सामाजिक सेवा होणार असून ग्राहकांना सर्व प्रकारची काळजी घेऊन ताजा भाजीपाला आणि फळे घरपोच मिळणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

ऑनलाइन भाजीपाला

* ठाण्यातील मी मराठी प्रतिष्ठान आणि क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि. यांच्या माध्यमातून ‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला’ यासाठी http://www.mmdcare.in संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच त्या सोबत ९९८७७३६१०३ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

* हव्या असलेल्या भाज्या आणि फळे यांची ऑनलाइन नोंद या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवर करता येणार आहे. खरेदी करण्यात आलेल्या वस्तूची रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध  आहे.

*  ज्या नागरिकांना ऑनलाइन पैसे भरणे शक्य होत नसल्यास त्यांना ऑर्डर आल्यानंतर पैसे देण्याची सुविधा  आहे.

*  ग्राहकांनी भाज्यांची किंवा फळांची मागणी करताना किमान ३०० रुपयांपासून अधिकची मागणी नोंदवणे गरजेचे आहे. मागणी नोंदविल्यापासून पुढील ४८ तासात त्या ग्राहकाला भाजी आणि फळे उपलब्ध होणार आहेत.